मराठा समाजातर्फे आरक्षणासाठी महामार्गावर ‘चक्का जाम’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

तासभर वाहतूक ठप्प; दीडशे जणांना अटक व सुटका
जळगाव - सकल मराठा समाजाला मराठा आरक्षण तत्काळ लागू करावे, कोपर्डी (जि. अहमदनगर) येथील घटनेतील संशयित आरोपींच्या शिक्षेसाठी शासनाने हालचाल करावी, शेतकऱ्यांसाठी तत्काळ ‘स्वामिनाथन’ आयोगाची अंमलबजावणी करावी, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वसतिगृहे सुरू करावीत यांसह विविध मागण्यांसाठी आज जळगाव जिल्हा समस्त मराठा समाजातर्फे आकाशवाणी चौकात ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले.

सकाळी अकराला सुरू केलेले आंदोलन अर्धा तास चालले. यात ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘एक मराठा-लाख मराठा’ आदी घोषणा आंदोलकांकडून देण्यात आल्याने परिसर दुमदुमला. आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची काही वेळ कोंडी झाली.

आंदोलक आकाशवाणी चौकात रिंगण करून बसले होते. त्यामुळे एकही वाहनाला महामार्गावरून ये-जा करता आले नाही. अर्धा तास आंदोलनानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नेले. तेथे काही वेळ बसवून नंतर सोडून देण्यात आले.

आंदोलनात प्रा. डी. डी. बच्छाव, सातपुडा ऑटोमोबाइल्सचे संचालक किरण बच्छाव, जिल्हा बॅंकेचे माजी संचालक वाल्मीक पाटील, विनोद देशमुख, सतीश पाटील, विनोद पाटील, राजेश पाटील, रवींद्र पाटील, राजेंद्र देशमुख, अशोक शिंदे, योगेश पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, ललित मराठे आदींनी सहभाग नोंदविला.

समाजाने एकजूट दाखवावी
प्रा. बच्छाव म्हणाले, की आपले आजचे आंदोलन यशस्वी झाले आहे. समाजाला आरक्षणासाठी आज जशी एकजूट दाखविली तशीच ती यापुढेही दाखवावी लागेल. समाजबांधवांनी एकत्र मागण्यांसाठी असेच एकसंघ राहावे.
 
वाहतूक वळविली
अजिंठा चौफुलीकडून जळगाव शहरात येणाऱ्या बस एस. टी. वर्कशॉप मार्गे नेरीनाका बसस्थानकाकडे, तर एरंडोलकडून येणाऱ्या बस बहिणाबाई उद्यानमार्गे बसस्थानकाकडे वळविण्यात आल्या. मोठी खासगी वाहने महामार्गाच्या कडेलाच आंदोलन संपेपर्यंत थांबविण्यात आली होती.