मोडकळीस आलेला संसाराच्या ‘आर्थिक’गाठी आल्या जुळून!

representational image of Crop
representational image of Crop

येवला : नाव मोठे अन लक्षण खोटे अशी अवस्था राज्यातील तालुका खरेदी विक्री संघांची झाली असून बोटावर मोजण्याइतपत संघच तग धरून आहेत. बाकीच्यांचा आर्थिक कणाच घसरल्याने संसार मोडकळीस आला आहे. अश्यातही बुस्टर डोस मिळावा असा आधार यंदा जिल्ह्यातील संघाना शासकीय आधारभूत खरेदी योजनेतून मिळाला आहे.या कमिशनमुळे अनेक संघ लखपती झाले असून ‘आर्थिक’गाठी जुळून आल्याने त्यांचा संसार देखील नव्या जोमाने उभा राहणार आहे.

व्यापाऱ्यांनी बाजारपेठा काबीज केल्याने व बाजार समित्यांकडे शेतकऱ्यांचा ओठा अधिक वाढल्याने राज्यातील जवळपास ३४५ खरेदी-विक्री संघ सध्या अडचणीतून जात असून अनेकांचे सर्वच व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत.

मुळात प्रत्येक तालुक्यां च्या ठिकाणी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये तसेच त्यांना शेती साहित्य रास्त भावात मिळावे यासाठी संघ स्थापन केले गेले.सुरुवातीला यात मशिनरी, आडत, कापड, रेशीम दुकाने,खते-बियाणे विक्री सुरू होऊन शेतकऱ्यांना योग्य दरात शेती साहित्य मिळत गेले.मात्र,आज ही परिस्थिती राहिलेली नाही.१९७२ मध्ये राज्य शासनाने कापूस एकाधिकार योजना सुरू केली.यासाठी राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन संस्थेची मुख्य अभिकर्ता तर संघांना उपअभिकर्ता म्हणून नेमले. त्या खरेदीतून संघाना खरेदीच्या १ टक्के कमीशनद्वारे उत्पन्न मिळू लागले होते.पुढे २००० नंतर व्यापाऱ्यांच्या स्पर्धेत खरेदी-विक्री संघ मागे पडत गेल्याचे चित्र दिसून येतेय.

जिल्ह्यातही हेच समीकरण असून अनेक संघांचा कारभार तर खते-बियाणे विक्रीवरच सुरु आहे. अनेकांनी आपला गाशा देखील गुंडाळला आहे.यावर्षी मात्र शासकीय आधारभूत आधारभुत किंमत योजनेअंर्तगत खरेदीला शेतकऱ्यांकडून उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन असलेल्या मकाला यंदा व्यापाऱ्याकडील भावात मोठी घट राहिली.त्या तुलनेत हमीभाव २०० ते ३०० रुपयांपेक्षा अधिक मिळत असल्याने शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करून नोडल एजन्सी असलेल्या तालुका खरेदी विक्री संघात मका विक्री केला.अर्थात सर्वच मका खरेदी न झाल्याने शेतकऱ्यांना सरतेशेवटी व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावात मका दिला.याशिवाय येवला व मालेगाव येथील संघाने तर मकासह तुर,हरबरा, सोयाबिन, मुग उडिद पिकांची देखील खरेदी करून उत्पन्न मिळवण्याची संधी सोडली नाही.       

येवल्याच्या संघात विक्रमी खरेदी
येवला तालूका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भागुनाथ उशीर यांनी मुंबई मार्केटिंग फेडरेशच्या सर्वसाधारण सभेत तालूक्यात खरेदीकेंद्र आग्रहापूर्वक या वर्षापासुन मंजूर करून घेतले.तसेच नियोजनबद्ध खरेदी प्रक्रिया राबवत नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक खरेदीचा विक्रम केला. जिल्हयात येवला, मालेगाव, लासलगाव, चांदवड, देवळा, सिन्नर, नांदगाव, सटाणा या ८ खरेदी केंद्रावर २० कोटी ६२ लाखांचा शेतमाल खरेदी झाला.त्यापैकी सर्वात जास्त खरेदी येवला संघाच्या खरेदी केंद्रावर ८ कोटी ५५ लाख १९ रुपयाची झाली आहे.

संघाना आधारभुत किंमत योजनेअंर्तगत १.५ टक्के कमिशनप्रमाणे मिळणारे अंदाजित उत्पन्न :
येवला : १२ लाख ८२ हजार ७९७ रुपये
मालेगाव : ४ लाख ४२ हजार ८९० रुपये
लासलगाव : ४ लाख ७१ हजार ६८६ रुपये
चांदवड : २ लाख ८३ हजार ४६४ रुपये
देवळा : १ लाख ९० हजार ३४ रुपये
सिन्नर : २ लाख ७४ हजार ३१६ रुपये
नांदगाव : ४४ हजार १६० रुपये
सटाणा : १ लाख ३ हजार ८४० रुपये

असा मिळाला आधारभूत भाव
मुग : ५५७५                 
उडिद : ५४५०
सोयाबिन : ३०५०
मका : १४२५ 
तूर : ५४५०                   
हरभरा : ४४००

“संघाच्या प्रगतीसाठी अध्यक्षपदी जेष्ठ नेते अॅड. माणिकराव शिंदे व प्रमुख नेत्यांची माझ्यावर विश्वास टाकला,तो सिध्द करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम केले.आधारभूत किंमत योजना प्रभावीपणे राबवल्याने शेतकऱ्यांना चार पैसे ज्यादा मिळाले व संघाला चांगला नफा झाला.यावर्षी नफा वाढवून दीड किंवा दोन टक्के मिळणार आहे.”
- भागुनाथ उशीर, अध्यक्ष-खरेदी विक्री संघ,येवला

“आधारभूत किंमतीमुळे शेतकऱ्यांना खाजगी बाजारापेक्षा नक्कीच २०० ते हजार रुपयांपर्यत अधिक भाव पिकांना मिळाला.त्यातच पैशेही वेळेत मिळाल्याने प्रतिसाद उत्तम मिळाला.संस्थेचे चेअरमन यांचे प्रयत्न, शेतकरी वर्गाचा विश्वास, सहाय्यक निबंधक, मार्केटिंग फेडरेशन व संचालक मंडळाचे विषेश सहकार्यामुळे आमचा संघ जिल्ह्यात अव्वलस्थानी आहे.
- बाबा जाधव, व्यवस्थापक, खरेदी विक्री संघ येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com