ऐतिहासिक गुरुद्वार जपतात जनसेवेचा वसा

ऐतिहासिक गुरुद्वार जपतात जनसेवेचा वसा

नाशिक - गुरू गोविंदसिंग यांच्या वास्तव्यामुळे नांदेडचे सचखंडसह मनमाडचे गुरुद्वारा शीख धर्मीयांचे तीर्थस्थळ म्हणून देशातच नव्हे; तर जगभरात परिचित आहे. या ऐतिहासिक गुरुद्वारांनी जनसेवेचा यज्ञ अखंडपणे पुढे सुरू ठेवलाय. इथे येणाऱ्या पंजाब अन्‌ देशभरासह जगभरातून येणाऱ्या भाविकांसोबत पर्यटकांना सामाजिक एकोप्याची शिकवण मिळते.

नांदेडचे गुरुद्वारा शीख बांधवांचे अमृतसरसारखे पवित्र स्थळ आहे. 1708 मध्ये तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब हे ठिकाण गोदावरी नदीच्या काठावरील मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण शहर असलेल्या नांदेडमध्ये स्थापित झाले. शीख धर्मीयांचे गुरू गोविंदसिंग हे गुरू या ठिकाणी होते. त्यांनी याचठिकाणी आपला देह ठेवला. त्यांच्या स्मरणार्थ गुरुद्वाराची उभारणी करण्यात आली. "ग्रंथसाहिब' हा धर्मग्रंथ हा आपला गुरू, असे गुरू गोविंदसिंग यांनी सांगितले. 1830 मध्ये पंजाबमधील कारागीर पाठवून सध्याचे तख्त साहिब हे ठिकाण महाराजा रणजितसिंग यांनी बांधले. ऐतिहासिकदृष्ट्या मानाचे स्थान असलेल्या नांदेडच्या गुरुद्वारातर्फे "ग्रीन सिटी' प्रकल्प राबवण्यात येत आहे. एक कोटी वृक्षांची लागवड केली आहे. या ठिकाणी सर्व धर्मीयांसाठी 24 तास लंगर चालतो. उन्हाळ्यात नांदेडकरांची तहान भागवण्यासाठी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. वैद्यकीय रुग्णालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला गुरुद्वारातर्फे जागा देण्यात आली आहे. गुरू गोविंदसिंग यांच्या कार्याची दखल घेत नांदेडमधील विमानतळासह स्टेडियमलाही त्यांचे नाव देण्यात आले आहे.

पंजाबसाठी स्वतंत्र रेल्वेगाडी
पंजाबमधून नांदेडमध्ये भाविकांना येण्यासाठी स्वतंत्र रेल्वेगाडी सुरू आहे. सकाळी साडेनऊला ही रेल्वेगाडी निघते. सायंकाळी चारला नांदेडमध्ये रेल्वेगाडी पोचते. भाविकांची नांदेडला येण्यासाठी मोठी गर्दी असल्याने रेल्वेगाडीसाठी प्रतीक्षा यादी मोठी असते. एरव्ही दिवसाला दहा ते पंधरा हजार भाविक गुरुद्वारातील दर्शनासाठी येतात. दिवाळी, दसरा, होळी, बैसाखी अशा उत्सवांसाठी दोन ते तीन लाख भाविकांची हजेरी नांदेडमध्ये असते. पंजाबप्रमाणेच कॅनडा, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांमधूनही इथे भाविक दर्शनासाठी येतात.

मनमाडची शान
मुंबई-कोलकता लोहमार्गावरील अन्‌ नांदेडच्या सचखंड गुरुद्वाराचे प्रवेशद्वार म्हणून मनमाडच्या (जि. नाशिक) गुरुद्वाराला मोठे महत्त्व आहे. गुरू गोविंदसिंग यांचे चरणस्पर्श या ठिकाणी झालेले आहेत. 1931 मध्ये बाबा निधानसिंगजी यांनी गुप्तसर साहिबची स्थापना करून गुरुद्वाराची उभारणी केली. या गुरुद्वारामध्ये सत्संग, कथा, कीर्तन चालते. सर्व धर्मीयांसाठी 24 तास लंगर चालवण्यात येतो; तसेच पंजाबमधून येणाऱ्या आणि पंजाबला जाणाऱ्या रेल्वेगाडीतील प्रवाशांना अन्नदान केले जाते. पौर्णिमेला इथे उत्सव होतो. त्या दिवशी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या तीन हजारांपर्यंत असते. एरव्ही हजाराहून अधिक भाविक, पर्यटक या तीर्थस्थळाला भेट देतात. गुरू गोविंदसिंग यांच्या नावाने शहरामध्ये माध्यमिक शाळा सुरू आहे. अडीच हजार विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. गुरू गोविंदसिंग यांची प्रतिमा मनमाड नगरपालिकेच्या कार्यालयात लावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com