हॉकर्स- अतिक्रमण विरोधी पथक पुन्हा भिडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

चौबे शाळेजवळ धुमश्‍चक्री; महिला कर्मचारी जखमी झाल्याने तणाव

चौबे शाळेजवळ धुमश्‍चक्री; महिला कर्मचारी जखमी झाल्याने तणाव
जळगाव - ख्वाजामियॉं झोपडपट्टीच्या जागेवर हॉकर्स स्थलांतराची प्रक्रिया आजपासून सुरू झाली खरी. मात्र, या प्रक्रियेला हॉकर्स व अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे गालबोट लागले. सुभाषचौक परिसरात चौबे शाळेजवळ हॉकर्स व अतिक्रमण विरोधी पथकात उडालेल्या धुमश्‍चक्रीत पथकातील महिला कर्मचारी जखमी झाली. वाद सुरू असताना हॉकर्स महिलेस चक्कर आल्याने ती खाली पडली व या घटनांमुळे परिसरात धावपळ उडून तणाव निर्माण झाला.

ख्वाजामियॉं झोपडपट्टीच्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात शहरातील 782 हॉकर्सचे स्थलांतर करण्याचा ठराव महासभेत करण्यात आला. त्यानुसार महापालिकेने ठरावांची अंमलबजावणी करत अतिक्रमण विभागाने नुकतेच (12 मे) हॉकर्सला सोडत पद्धतीने जागा क्रमांक दिले. त्यानुसार आज (ता. 15) हॉकर्सला दिलेल्या जागेवर बसण्याचा सूचना देत इतर कुठल्याही जागेवर बसू नये, असा इशारा अतिक्रमण विभागाने दिला होता. तरी हॉकर्सने महापालिकेला विरोध दर्शवीत सुभाष चौक, बळीरामपेठेत दुकाने थाटून फळ व भाजी बाजार भरलेला होता.

पथक येताच बाजारात धावपळ
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने सकाळी अकराच्या सुमारास सानेगुरुजी चौकापासून कारवाईला सुरवात केली. बळीरामपेठ चौकापर्यंत पथक पोचताच रस्त्यावर बसलेले विक्रेत्यांमध्ये एकच धावपळ झाली. गांधी मार्केटजवळ महापालिका कर्मचारी व आंबे विक्रेत्यांमध्ये सर्वप्रथम शाब्दिक वाद झाला. यावेळी महापालिका कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला. आंबे विक्रेत्यांची लोटगाडी व माल जप्त करण्यात आला.

चौबे शाळेत लपविला माल
बळीरामपेठ चौकातील वाद मिटल्यानंतर सुभाष चौकाकडे पथक जाताना रामलालजी चौबे शाळेसमोरील काही विक्रेत्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांशी कारवाई करताना वाद केला. त्यात काही विक्रेत्यांनी आधीच आपला माल बाजूलाच असलेल्या चौबे शाळेत लपविला असल्याची माहिती महापालिका कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यांनी चौबे शाळेकडे मोर्चा वळविला परंतु शाळेचे मुख्यद्वार हॉकर्सने बंद केले होते. कर्मचाऱ्यांनी दार उघडून शाळेमध्ये प्रवेश करून माल जप्त केला.

शाळेच्या प्रांगणात हाणामारी
चौबे शाळेत लपवून ठेवलेला माल अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्यांनी जप्त करण्याचा प्रयत्न केला. यामुळे विक्रेते व महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. वाद वाढत गेल्याने विक्रेते व कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. तसेच काही महिला विक्रेत्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ सुद्धा केली. या वादात भाजीपाला विक्री करणारी लक्ष्मी राही ही महिला बेशुद्ध झाली. या महिलेस तत्काळ उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

महिला कर्मचाऱ्यास मारहाण
कारवाईप्रसंगी महापालिका कर्मचारी व हॉकर्सध्ये वाद होऊन तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीच्या घटनेत भाजीपाला विक्रेता सुनील मराठे याने अतिक्रमण विभागातील आशा रानवडे यांना वजन काटा मारून फेकल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भाजीपाला फेकल्याचा आरोप
पथकातील कर्मचारी हॉकर्सचे माल व साहित्य जप्तची कारवाई करीत असताना सुभाष चौकातील काही भाजी विक्रेत्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून देत पथकातील कर्मचाऱ्यांशी वाद घातला. कारवाईच्या नावाखाली भाजीपाला फेकल्याचा आरोप करीत परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता.

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर
गेल्या पाच-सहा महिन्यांपासून हॉकर्सवरील कारवाई करताना अनेकदा वाद होऊन हाणामारी झाली होती. त्यात आज पुन्हा हॉकर्सचे स्थलांतर करताना हॉकर्स व पथकातील कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे सुभाष चौक, बळीरामपेठ चौकातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

हॉकर्सचा प्रसारमाध्यमांशी वाद
अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी व भाजीपाला विक्रेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या वेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही त्याठिकाणी जमले. काही हॉकर्सनी त्यांच्याशीही वाद घातला. तर महिला विक्रेत्यांनी प्रसारमाध्यमातील छायाचित्रकारांना शिवीगाळही केली.