जातिधर्मापलीकडे शिक्षकाचा आदर्शवत ज्ञानयज्ञ

जातिधर्मापलीकडे शिक्षकाचा आदर्शवत ज्ञानयज्ञ

शिक्षक दिन विशेष

लामकानी- जातिधर्माच्या भिंती ओलांडून मुस्लिम समाजातील तरुण शिक्षक एका आदिवासी विद्यार्थ्याचे भवितव्य घडवीत आहे. शिक्षकाचा हा ज्ञानयज्ञ केवळ शिक्षणासाठी दत्तक घेण्यापुरता नव्हे, तर त्या विद्यार्थ्यास आपल्या कुटुंबामध्ये सामावून घेत सुरू झाला आहे. यातून या धाडसी शिक्षकाने समाजापुढे खरा आदर्श निर्माण केला आहे. 

माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती उद्या (ता. 5) शिक्षक दिन म्हणून साजरी होत आहे. त्यात चाकोरीबाहेर कार्य उभारणाऱ्या बळसाणे (ता. साक्री) येथील तरुण शिक्षक अनिस शाह मुनीर शाह यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यांनी जातिधर्माच्या भिंती ओलांडून रामनाथ सोमनाथ राऊत या आदिवासी विद्यार्थ्याला दत्तक घेत आपल्या कुटुंबातही सामावून घेतले आहे. त्याचे पालनपोषणही करीत आहेत.

रामनाथ राऊतची भेट
सद्यःस्थितीत ऐचाळे (ता. साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेत श्री. शाह शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते 2005 मध्ये त्र्यंबकेश्‍वर (जि. नाशिक) तालुक्‍यातील कामथपाडा येथे रुजू झाले. त्र्यंबकेश्‍वरपासून 55, तर नाशिकपासून 72 किलोमीटरवरील दुर्गम आदिवासीबहुल कामथपाडा आहे. तेथे शिक्षक शाह दवेडोंगरा केंद्रशाळेपासून सात किलोमीटर पायपीट करत पोहोचले. सुविधांचा अभाव असलेल्या कामथपाड्यात शाह यांनी विद्यार्थी पट 25 ने वाढविला. शाळेचा लौकिक वाढविला. त्यावेळी पहिले ते चौथीचे शिक्षण घेणारा आदिवासी होतकरू व हुशार विद्यार्थी रामनाथ हा शाह यांच्या नजरेत आला.

उचलले धाडसी पाऊल
चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही रामनाथ उत्तीर्ण झाला. पुढील शिक्षण खंडित करीत तो कामथपाड्यात आजी-आजोबांकडे राहता होता. त्याची आई सुशीला आणि वडील सोमनाथ मोलमजुरीसाठी काही दिवस नाशिकला जात- येत असत. ही स्थिती पाहून, धाडस करत शिक्षक शाह यांनी राऊत कुटुंबाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देत रामनाथला बळसाणे येथे नेण्याची परवानगी मागितली. शिक्षक शाह यांचा जिव्हाळा आणि काळजी पाहून आणि रामनाथ हा एकुलता असूनही त्याच्या भवितव्यासाठी आईवडिलांनी शाह यांना परवानगी दिली. रामनाथचा पुढील प्रवास बळसाणेतून सुरू झाला.

शाह परिवारात सामील
शाह यांच्या परिवारातील आई-वडील, भाऊ- वहिनी, शिक्षक शाह यांच्यासोबत रामनाथ राहू लागला. त्याने पाचवी ते दहावीचे शिक्षण बळसाणे येथील एएनजी विद्यालयातून पूर्ण केले. दहावीत 79 टक्के गुण मिळविले. नंतर शिक्षक शाह यांनी त्याला पुढील शिक्षणासाठी दोंडाईचा येथील आरडीएमपी महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला. रामनाथ आता बारावीच्या विज्ञान शाखेत आहे. तो रोज बळसाणे ते दोंडाईचा, असा प्रवास करतो. शिक्षक शाह यांची आई शमीमबी रामनाथला मुलाप्रमाणे जीव लावतात. जेवणाचा डबा देतात. शिक्षक शाह यांचे वडील मुशीर, ज्येष्ठ बंधू युनूसही रामनाथला कुटुंबातील सदस्याप्रमाणेच प्रेमाची वागणूक देतात.

धर्मपंथाची भिंत ओलांडली
शमीमबी म्हणतात, "उपरवालेने दो नही तीन बेटे दिये है‘. शिक्षणासारख्या पवित्र कार्यात धर्म- पंथ आडवा येत नाही, याचेचे हे प्रतीक आहे. आदर्शपणाचा कुठलाही गाजावाजा न करता, धर्मनिरपेक्ष भावनेने शिक्षक शाह यांचा अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा मानवतेसह ज्ञानयज्ञ आदर्श पुरस्काराच्याही पुढचा पल्ला गाठणारा आहे. मित्र दिलीप पवार, भास्कर मास्तर यांच्यासारख्या मित्र परिवारासह सान्निध्यात आलेल्या सर्व शिक्षकांमुळे चांगले विचार कृतीतून पेरू शकलो, असे शिक्षक शाह सांगतात.

परस्परांप्रती प्रेमभाव
जिल्ह्यात 2011 मध्ये बदली होऊन आलेले शिक्षक शाह सांगतात, की रामनाथच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी पार पाडत राहील. त्याच्या इच्छेनुसार पुढील अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन देईल. त्याचा खर्च पेलेल. विद्यार्थी रामनाथ सांगतो, की कुटुंबाप्रमाणे शाह परिवाराकडूनही प्रेम मिळत आहे. त्याचा आनंद शब्दांत व्यक्त करू शकत नाही. वर्षातून एकदा घरी जातो. आई-वडिलांसह बहिणी सारिका, प्रशिला यांची भेट घेतो आणि बळसाण्यातील घरी परततो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com