वाढीव गुणांसाठी खेळाडूंना उद्यापर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

इगतपुरी - शैक्षणिक वर्ष 2016-17 पासूनच शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत वाढीव गुण देण्यात येणार आहेत. यासाठी प्रस्ताव सादर करण्याची मुदत शनिवार (ता. 27) पर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे अद्याप वाढीव गुणांसाठी प्रस्ताव सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी मिळाली आहे.

राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या परीक्षेत 15 ते 25 गुण अतिरिक्त दिले जातात. क्रीडा क्षेत्राबरोबरच शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचा उपयोग भविष्याच्या प्रगतीसाठी व्हावा, या उद्देशाने दहावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. शास्त्रीय कला, चित्रकला व लोककलेशी संबंधित 53 संस्थांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना हा फायदा मिळणार आहे. या सवलतीचा पात्र विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, यासाठी वाढीव गुणांचे प्रस्ताव मंडळाकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती.