‘लाँगेस्ट योगा मॅरेथॉन- फिमेल’ संवर्गात प्रज्ञा पाटील यांचा १०३ तासांचा विश्‍वविक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

इगतपुरी - नाशिक येथील योग प्रशिक्षक प्रज्ञा पाटील यांनी ‘लाँगेस्ट योगा मॅरेथॉन- फिमेल’ या संवर्गात सलग १०३ तास योगा मॅरेथॉनचा नवा विश्‍वविक्रम प्रस्थापित करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले. पिंपरी (ता. इगतपुरी) येथील ग्रॅंड गार्डन रिसॉर्टमध्ये ‘गिनीज बुक’चे प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांनी त्यांना अधिकृत प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

इगतपुरी - नाशिक येथील योग प्रशिक्षक प्रज्ञा पाटील यांनी ‘लाँगेस्ट योगा मॅरेथॉन- फिमेल’ या संवर्गात सलग १०३ तास योगा मॅरेथॉनचा नवा विश्‍वविक्रम प्रस्थापित करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले. पिंपरी (ता. इगतपुरी) येथील ग्रॅंड गार्डन रिसॉर्टमध्ये ‘गिनीज बुक’चे प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांनी त्यांना अधिकृत प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला.

योग प्रशिक्षक पाटील यांनी १६ जूनला पहाटे साडेचारला योगा मॅरेथॉनला सुरवात केली होती. आज सकाळी त्यांनी सलग एकशे तीन तास पूर्ण करून नवा विश्‍वविक्रम प्रस्थापित केला. या संवर्गातील यापूर्वीचा सलग ५७ तास २ मिनिटांचा विश्‍वविक्रम तामिळनाडूच्या के. पी. रचना यांच्या नावावर होता. तो त्यांनी रविवारी (ता. १८) दुपारीच मोडीत काढत नाशिकचे नाव गिनीज बुकात झळकावले. त्‍यांचे सासर जळगाव जिल्ह्यातील पूनखेडा हे आहे. 

या योगा मॅरेथॉनसाठी प्रा. डॉ. मीनाक्षी गवळी यांनी निरीक्षक (स्टार्टर आणि फिनिशर) म्हणून काम पाहिले. तर, या एकशे तीन तासांदरम्यान प्रा. सुनील आहेर, पिराजी नरवाडे, मनीषा काटकर, राजेंद्र निकुंभ, नीता नगरकर, रेवती नरवाडे यांनी काळजीवाहक म्हणून काम पाहिले. दरम्यान, आज गिनीज बुकचे प्रतिनिधी श्री. डांगरीकर यांनी सर्व पुराव्यांची पाहणी करून, या नव्या विश्‍वविक्रमाची घोषणा केली आणि त्यांना सन्मानपूर्वक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले.

प्रज्ञा पाटील यांचे वडील वसंतराव गवांदे, आई मुग्धा गवांदे, मुलगा गौरव आणि मुलगी गौरांगी पाटील यांच्यासह कुटुंबीय या वेळी उपस्थित होते. या विश्‍वविक्रमी कामगिरीसाठी अविनाश गोठी, डॉ. यु. के. शर्मा, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, रोहिणी नायडू, वंदना रकीबे, दीपाली गवांदे, लता जगताप, आशा डोके आदींसह पाटील कुटुंबियांचे सहकार्य लाभल्याचे पाटील यांनी या वेळी आवर्जून सांगितले. 

‘योगा मॅरेथॉनमध्ये विश्‍वविक्रम करण्याचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. आज स्वप्नपूर्ती झाल्याने माझ्यासाठी हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. थोडेसे दडपण नक्कीच होते; पण ’गिनीज’चे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे झालेला आनंद नक्कीच त्यापेक्षा मोठा आहे.
-- प्रज्ञा पाटील, लाँगेस्ट योगा मॅरेथॉन- फिमेल संवर्गातील विश्‍वविजेत्या.

‘प्रथमतः प्रज्ञाताईंचे अगदी मनःपूर्वक अभिनंदन. एक नाशिककर म्हणून त्यांच्याबद्दल नक्कीच अभिमान आहे. योग प्रसारासाठी त्यांचे निश्‍चितच भरीव योगदान आहे. यापुढेही त्यांच्या हातून उत्तम कामगिरी सातत्याने होत रहावी, यासाठी समस्त नाशिककरांच्या वतीने शुभेच्छा!
- सीमा हिरे, आमदार.

कोण आहेत प्रज्ञा पाटील
प्रज्ञा पाटील या नाशिकमधील प्रसिद्ध योग प्रशिक्षक आहेत. लहानपणापासून त्यांना योगशास्त्राची आवड असून, त्यांनी योगशास्त्रातच पदव्युत्तर पदवी (एम. ए.) मिळवली आहे. सध्या त्या योगशास्त्रात पी. एचडी. करत आहेत. अहमदाबाद (गुजरात) हे त्यांचे माहेर, तर जळगाव जिल्ह्यातील पुनखेडा हे त्यांचे सासर आहे. नाशिकमध्ये त्या व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या आहेत.