रेव्ह पार्टी करणाऱ्या 15 जणांना अटक

विजय पगारे
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

इगतपुरी - बलायदुरी (ता. इगतपुरी) येथील रेन फॉरेस्ट या पंचतारांकित हॉटेलावर छापा घालून मंगळवारी (ता. 3) रात्री इगतपुरी पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतले.

इगतपुरी - बलायदुरी (ता. इगतपुरी) येथील रेन फॉरेस्ट या पंचतारांकित हॉटेलावर छापा घालून मंगळवारी (ता. 3) रात्री इगतपुरी पोलिसांनी 15 जणांना ताब्यात घेतले.

मुंबई-आग्रा महामार्गापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या हॉटेलबाबत यापूर्वी अनेक तक्रारी असल्याने इगतपुरी पोलिसांनी अचानक कारवाई केली. संबंधित हॉटेलमालक दडपशाही करून ग्रामीण जनतेच्या जमिनी ताब्यात घेत असल्याच्याही तक्रारी आहेत.

पोलिस निरीक्षक संजय शुक्‍ला यांच्या मार्गदर्शनाखाली रेन फॉरेस्ट रिसॉट येथे छापा घातला. तेथे मद्यधुंद अवस्थेत काही तरुण-तरुणी नृत्य करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना अटक केली.

त्यातील काही जण पुणे व नाशिक जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले. यातील बहुतेक जण 20 ते 25 वर्ष वयोगटातील आहेत. या सर्वांची इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणी सुरू आहे. कारवाईत पोलिसांनी डीजे साहित्य, एक मोटार जप्त केली. दरम्यान, या हॉटेलात अनेक गैरप्रकार चालत असल्याचा संशय स्थानिक ग्रामस्थांना आहे; मात्र हॉटेल मालकाच्या दहशतीमुळे ग्रामस्थ गप्प होते.

मिस्टीक व्हॅलीतील घटनेला उजाळा -
इगतपुरी शहराजवळ मिस्टीक व्हॅली या हॉटेलच्या परिसरातील बंगल्यात सुरू असलेल्या बॅचलर पार्टीवर 27 मार्च 2017 रोजी इगतपुरी पोलिसांनी छापा घातला होता. यात चार युवतींसह 13 जणांना अटक केली होती. उच्चभ्रू व प्रतिष्ठित घरातील सुशिक्षित तरुणांना अटक करण्यात आल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती.

Web Title: igatpuri nashik news rave party 15 arrested