तंत्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

बारावी पुरवणी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी

बारावी पुरवणी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी
इगतपुरी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्रात प्रवेश घेता यावा यासाठी तंत्रशिक्षणाची प्रवेशप्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने हजारो विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण प्रवेशाची संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे त्यांचे वर्षदेखील वाया जाणार नाही.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रवेश 15 ऑगस्टपर्यंत करण्याचे वेळापत्रक देण्यात आले होते. कोणत्याही स्थितीत रिक्त जागांवरील प्रवेश 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण होतील, अशी हमीदेखील विविध राज्य सरकारांनी दिली होती. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने बारावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून जुलैमध्येच पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 11 ते 28 जुलै या कालावधीत राज्यातील सुमारे 91 हजार 848 विद्यार्थ्यांनी पुरवणी परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल 22 ऑगस्टला जाहीर होणार आहे; परंतु या विद्यार्थ्यांना 15 ऑगस्टच्या मुदतीमुळे प्रवेशाची संधी मिळणार नव्हती. त्यामुळे प्रवेशाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवून देण्याची राज्याची विनंती परिषदेने मान्य केली. महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसारच तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविलेली आहे.