इगतपुरी रेल्वेस्थानक विविध समस्यांच्या गर्तेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

मौलाना आझाद विचार मंच, प्रवासी संघाचा आंदोलनाचा इशारा

1997 मध्ये दादर (मुंबई) रेल्वेस्थानक असेच घुशी, उंदरांनी पोखरून पोकळ केले होते. त्याची रेल्वे प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे मोठी दुर्घटना होऊन शेकडो रेल्वे प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते. ही वेळ इगतपुरीत येऊ नये म्हणून या तक्रारीची दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

इगतपुरी : राज्यातील महत्त्वपूर्ण स्थानकांपैकी एक इगतपुरी रेल्वेस्थानक विविध समस्यांनी ग्रस्त असून, त्या सोडविण्यासाठी प्रशासन आस्था दाखवत नाही. लोकप्रतिनिधीही याबाबत सक्रिय भूमिका घेताना दिसत नाहीत. याबाबत मौलाना आझाद विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष व प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक आयाज अकबर खान, रेल्वे प्रवासी संघाचे गोदावरी एक्‍स्प्रेसचे अध्यक्ष सचिन चांदणे यांच्या नेतृत्वाखाली स्मरणपत्र व निवेदन महाव्यवस्थापक देवेंद्र शर्मा यांचे सचिव राजेश साहानी यांना मुंबई रेल्वे कार्यालयात नुकतेच दिले.

निवेदनात मुंबई-भुसावळ व लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरी रेल्वेस्थानकात पाणी भरण्यासाठी व अतिरिक्त इंजिन लावण्यासाठी थांबतात. येथील चारही फलाटांवरील उंदीर, घुशींचा उपद्रव कमी होत नाही. त्यांनी पोखरलेल्या फलाटांमुळे स्थानकात प्रवेश करणाऱ्या गाड्यांचा मोठ्या प्रमाणात हादरा बसतो. अनेक प्रवासी खड्ड्यात व खचलेल्या भागात अडकून पडतात. काही वेळा गाडी घसरण्याची भीती प्रवासी व्यक्त करतात.

1997 मध्ये दादर (मुंबई) रेल्वेस्थानक असेच घुशी, उंदरांनी पोखरून पोकळ केले होते. त्याची रेल्वे प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे मोठी दुर्घटना होऊन शेकडो रेल्वे प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते. ही वेळ इगतपुरीत येऊ नये म्हणून या तक्रारीची दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. स्थानकात विक्री होणारे खाद्यपदार्थ उंदीर, घुशीने कुरतडलेले असतातच; परंतु त्यात बऱ्याचदा लेंड्याही आढळतात. मात्र, त्याची तक्रारही न घेता संबंधित कॅन्टीन ठेकेदाराला स्थानिक प्रशासन पाठीशी घालते, असा आरोप त्यात केला आहे.

भारत स्वच्छता अभियानांतर्गत स्थानक प्रशासन स्वच्छतेबाबत सतर्क नसून केवळ पगारी नोकरदाराची भूमिका बजावत असल्याचे नमूद करून, उद्‌घोषणाही (अनाउन्समेंट) नियमित नसल्याने प्रवाशांचा बऱ्याचदा गोंधळ उडतो. त्यात दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रासाला सामोरे जावे लागते. या समस्यांबाबत रेल्वे प्रशासन अत्यंत निरुत्साही असून, त्या आठ ते दहा दिवसांत सोडवाव्यात. अन्यथा रेल्वे प्रवासी हक्कासाठी मौलाना आझाद विचार मंच व रेल्वे प्रवासी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
निवेदनावर माजी नगरसेवक बाळासाहेब गांगुर्डे, डॉ. सुधीर पंडित, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. तराठे, संदीप धामणे, नगरसेवक यशवंत दळवी, नीलेश पवार, श्रीमती एस. एस. जाधव, प्रशांत घुसळे, विकास साळवे, राहुल जोशी, राहुल हिरे, चंद्रकांत शिंदे, नीलेश मोरे, डॉ. सचिन उगले, ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल रहेमान खान, डॉ. किरण ओस्वाल व एम. ए. फारुकी आदींच्या सह्या आहेत.