चीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव 

चीनमधील पावसामुळे भारतीय उन्हाळ कांदा खाणार भाव 

नाशिक - चीनमध्ये पाऊस झाला. तसेच कर्नाटकमधील बंगळूर रोझ या सांबरसाठी जगभर वापरल्या जाणाऱ्या कांद्याच्या काढणीला पावसामुळे ब्रेक लागला. त्यामुळे साठवणुकीतील भारतीय कांदा जागतिक बाजारपेठेत भाव खाणार आहे. तसेच दुसरीकडे ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारल्याने राज्यातील पोळ (खरीप) कांद्याची लागवड दीड महिना रखडली. आता श्रावणसरींच्या भरवशावर शेतकऱ्यांना लागवडीला सुरवात केली असून, नोव्हेंबरमध्ये हा कांदा बाजारात येताच, चांगला भाव मिळण्याची शक्‍यता आहे. 

पावसाअभावी विहिरींच्या पातळीत वाढ झालेली नाही. मात्र, श्रावणातील दोन दिवसांच्या पावसाने उभारी मिळालेल्या शेतकऱ्यांनी पोळ कांदा लागवडीस सुरवात केली आहे. उन्हाळ कांदा नोव्हेंबरपर्यंत संपत येईल, अशा काळात पोळ कांदा बाजारात येण्यास सुरवात होईल आणि पर्यायाने या कांद्याखेरीज ग्राहकांकडे दुसरा पर्याय राहणार नाही. खरे म्हणजे, पोळ कांद्याची लागवड पोळ्यापर्यंत पूर्ण होत असते. मात्र, अगोदरच लागवडीला विलंब झाल्याने शेतकऱ्यांना कसल्याही परिस्थितीत 20 सप्टेंबरपर्यंत लागवड उरकावी लागणार आहे. अर्थात, त्यासाठी पावसाची साथ लाभणार आहे. सद्य-स्थितीत कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, नांदगाव, चांदवड, येवला, सिन्नर आणि निफाड तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पोळ कांद्याच्या लागवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे. पोळ कांद्याच्या लागवडीसाठी पाचशे ते सहाशे रुपये किलो भावाचे बियाणे शेतकऱ्यांना नऊशे रुपयांपर्यंत विकत घ्यावे लागत आहेत. 

50 लाख टनांपर्यंत साठा 
उन्हाळ कांद्याचा देशभरात पन्नास लाख टनापर्यंत साठा असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यातील निम्मा कांदा नोव्हेंबरपर्यंत खाण्यासाठी वापरला जाईल. दहा लाख टन कांद्याचे नुकसान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. म्हणजेच, नोव्हेंबरपर्यंत पंधरा लाख टन कांद्याची निर्यात झाल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, अशी स्थिती सध्या आहे. दरम्यान, खरिपातील मका, सोयाबीनची काढणी झाल्यावर ऑक्‍टोबरनंतर लेट खरीप म्हणजेच, रांगडा कांद्याची लागवड सुरू होईल. हा कांदा जानेवारी ते मार्च 2019 पर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. त्यानंतर एप्रिल ते 15 जूनपर्यंत पाण्याच्या उपलब्धतेच्या आधारे शेतकरी उन्हाळ कांद्याची लागवड सुरू करतील. 

कांदा उत्पादनाचा ताळेबंद 
नांगरणी ते लागवड - एकरी 35 हजार रुपये (शेणखत, मशागत, मजुरी, रोपे) 
लागवडीनंतर काढणीपर्यंत - 26 हजार रुपये (निंदणी, काढणी, रासायनिक खते, औषधे, मजुरी) 
एकरी उत्पादन - 60 ते 70 क्विंटल 

""जागतिक बाजारपेठेतील भाव चीन आणि पाकिस्तानच्या कांद्यावर अवलंबून असतात; पण पावसामुळे चीनमधील कांद्याची निर्यात कमी झाल्यास भारतीय उन्हाळ कांद्याला चांगला भाव अपेक्षित आहे. त्यादृष्टीने निर्यातीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कर्नाटकमधील निर्यातक्षम खरीप कांद्याची आवक होणार असून, महाराष्ट्रातील खरीप कांद्याला देशांतर्गत चांगला भाव मिळणार आहे.'' 
- चांगदेवराव होळकर (नाफेडचे माजी अध्यक्ष) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com