राज्यात अधिकारी अकार्यक्षम - पांडुरंग फुंडकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

जळगाव - राज्यातील कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी नाहीत, त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहेत, जलयुक्त शिवाराची कामेही चांगली होत नाहीत, अशी व्यथा विरोधकांनी नव्हे तर राज्याच्या कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी  व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांच्या कामाबाबत सत्ताधारी भाजपचे खासदार आमदार केविलवाणे, तर मंत्री हतबल असल्याचे दिसून आले. जळगाव येथील जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीतील ही स्थिती होती.

पालकमंत्री नसल्याने जळगाव जिल्ह्यात नियोजन मंडळाची सहा महिन्यांपासून बैठकच झाली नाही. पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना जळगावात येण्यास वेळ मिळाला नाही, अखेर नवरात्रातील अष्टमीचा मुहूर्त आणि रविवार असा मेळ करून ते जळगावातील बैठकीस आले. बैठकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे खासदार ए. टी. पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या कामाबाबत तक्रार केली. अधिकारी सांगूनही खासदार, आमदारांची कामे ऐकत नाहीत, अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली. तर भाजपचेच चाळीसगाव येथील आमदार उन्मेष पाटील यांनीही अधिकारी कोणतीही कामे करीत नसल्याची तक्रार या वेळी करून खंत व्यक्त केली. 

आपण सत्तेत आहोत, पालकमंत्रीही आपलेच आहेत, त्यामुळे अधिकाऱ्यांबाबत ते सक्त आदेश देतील, अशी तक्रारदार लोकप्रतिनिधीना होती. परंतु त्यापेक्षाही कडी म्हणजे फुंडकर यांनी मत व्यक्त करताना आपल्याकडे कृषी हे राज्याचे क्रमांक दोनचे मंत्रिपद असल्याचे सांगितले. मात्र त्यांनीही प्रशासकीय अधिकारी कार्यक्षम नसल्याचे रडगाणेच गायले, ते म्हणाले, की अधिकारी पाहिजे त्या प्रमाणात कार्यक्षम नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तर पूर्णपणे अकार्यक्षम आहेत. ते साइटवर जाऊन रस्त्याचे काम कसे झाले आहे, खडी, डांबर यांची ते कधीच पाहणी करीत नाहीत, सर्व काही मक्तेदारावर सोपवितात  त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडतात.

तीस टक्के बिलो टेंडर कशी?
राज्यातील कामाच्या निविदेवरच कृषिमंत्र्यांनी सवाल व्यक्त केला आहे. ते म्हणाले, की राज्यात रस्ते, जलयुक्त शिवार तसेच इतर कामांत चक्क तीस टक्के बिलोने कामे घेतली जातात. ठेकेदार हे कसे करतात याचेच आपणास आश्‍चर्य वाटते, त्यांना परवडते तरी कसे, असा प्रश्‍न आहे. त्यामुळे काम कशा प्रकारे करतील किंवा करतच नाही, हे दिसून येईल.