अतिक्रमण, आरोग्य विभागाच्या कामांवर सदस्य नाराज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

महापालिका ‘स्थायी’च्या सभेत तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप 
जळगाव - शहरातील नागरिकांशी निगडीत असलेल्या कचरा, शौचालयांची साफसफाई होत नसल्याने होणारा त्रास. तसेच अनेक रस्त्यांवर पुन्हा हॉकर्सचे होणाऱ्या अतिक्रमणामुळे स्थायी समितीच्या सभेत आज सदस्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त करून ताशेरे ओढले. तसेच आयुक्त जीवन सोनवणे यांनीही सभेत अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. 

महापालिका ‘स्थायी’च्या सभेत तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचा आरोप 
जळगाव - शहरातील नागरिकांशी निगडीत असलेल्या कचरा, शौचालयांची साफसफाई होत नसल्याने होणारा त्रास. तसेच अनेक रस्त्यांवर पुन्हा हॉकर्सचे होणाऱ्या अतिक्रमणामुळे स्थायी समितीच्या सभेत आज सदस्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त करून ताशेरे ओढले. तसेच आयुक्त जीवन सोनवणे यांनीही सभेत अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. 

महापालिका स्थायी समितीची सभा आज सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर आयुक्त सोनवणे, शहर अभियंता डी. एस. थोरात, नगरसचिव निरंजन सैंदाणे उपस्थित होते. सभेत भाजपच्या सदस्य उज्वला बेंडाळे यांनी म्युनिसिपल कॉलनीतील सार्वजनिक शौचालयांच्या दुरवस्थेचा प्रश्‍न उपस्थित केला. तसेच या सार्वजनिक शौचालयांतील पाण्याच्या टाकीत जंतू पडले आहेत. तसेच येथे पाणीही उपलब्ध नाही, यासंदर्भात अनेकवेळा आरोग्य विभागाकडे तक्रार केली. त्याला उत्तर देताना आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी पाहून घेतो, असे मोघम उत्तर दिले. भाजप सदस्य पृथ्वीराज सोनवणे यांनी महिनाभरापूर्वीही तक्रार केली असल्याचे सांगितले; तर आयुक्त सोनवणे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करत सार्वजनिक शौचालय आणि शहरातील प्रत्येक भागात पाणी पोहोचले पाहिजे आणि स्वच्छता झाली पाहिजे, अशी सूचना पाणीपुरवठा व आरोग्य विभागाला दिल्या. 

खडीच्या रस्ते दुरुस्तीला भाजपचा विरोध
शहरातील खडीच्या रस्त्यांची दुरुस्तीचा प्रस्ताव सभागृहात आल्यावर पृथ्वीराज सोनवणे यांनी खडीचे रस्ते कसे दुरुस्त केले जातात, असा प्रश्‍न उपस्थित केला. याला शहर अभियंता डी. एस. थोरात यांनी या रस्त्यांची दुरुस्ती अतिरिक्त खडी टाकून केली जात असल्याचे स्पष्ट केले. प्रस्तावात कोणत्या रस्त्याचे काम केले जाणार आहे त्यांची यादी दिलेली नसल्याने प्रस्तावाला विरोध केला. 

हॉकर्सची नोंदणी करून घ्या
अतिक्रमणाच्या विषयावरून आयुक्त सोनवणे यांनी अतिक्रमण अधीक्षकांना सूचना करताना सांगितले, की हॉकर्सना कोणतीही पूर्वसूचना देण्याची गरज नाही. नोंदणीकृत हॉकर्सला जागा द्यावी. ज्या हॉकर्सची नोंदणी नाही त्यांची नोंदणी करून घ्या. 

ऐंशी ओटे असूनही स्थलांतर नाही 
अनंत जोशी यांनी महाबळ, मू. जे. महाविद्यालय, गणेश कॉलनी, रामानंदनगर, शिवाजीनगर, महाराणा प्रताप पुतळ्याजवळ अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या हॉकर्सचे भास्कर मार्केटमधील तयार ऐंशी ओट्यांवर स्थलांतर करावे, अशी मागणी केली. तसेच फुले मार्केटप्रमाणे भोईटे मार्केटमधील दुकानदारही ओट्यांवरील जागा भाड्याने देत आहेत, ते थांबवून हॉकर्सचे येथे स्थलांतर करावे, असे सांगितले. 

अतिक्रमण वाढल्याने शहराचा सत्यानाश
‘मनसे’चे सदस्य अनंत जोशी यांनी रामदास कॉलनी, गिरणा टॉकी चौकातील हॉकर्सच्या वाढत्या अतिक्रमणाचा मुद्दा सभेत उपस्थित केला. यासंदर्भात अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान यांच्याकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून कारवाई केली जात नाही. तसेच गिरणा टाकीजवळील अतिक्रमण काढताना नगरसेविकेने फोन करून अतिक्रमण राहू देण्याचे सांगितले होते. त्यावर उज्ज्वला बेंडाळे यांनी जोपर्यंत भाजीपाला विक्रेत्यांना झोन आखून दिला जात नाही तोपर्यंत तेथे विक्री करू द्यावी, टपरीधारक आणि इतरांवर कारवाई केल्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले. अतिक्रमण अधीक्षक खान म्हणाले, की दूध बूथ आणि टपरीधारकांना दोन दिवसांपूर्वी सूचना दिल्याचे सांगितले.

Web Title: Infringement, the health department's work, members upset