नाशिक - रामतीर येथे वॉटर एटीएम हा जलशुध्दीकरण प्रकल्पाची सुरवात

Water-ATM
Water-ATM

अंबासन (नाशिक) : रामतीर (ता.बागलाण) येथील ग्रामपंचयातीने मुलभुत सेवा योजनेंतर्गत वॉटर एटीएम हा जलशुध्दीकरण प्रकल्प बसविला आहे. पाणीटंचाईच्या काळात पाचशे रुपयांनी टँकरने घेऊन आरओद्वारे थंड व शुध्द पाणी अवघ्या पन्नास पैशात एक लिटर पाणी ग्रामस्थांना दिले जाते. या वॉटर एटीएमद्वारे शुध्द पाणी देऊन गामपंचायत ग्रामस्थांचे आरोग्य जपत आहे.  

बागलाण तालुक्यापासुन सुमारे वीस किमी. अंतरावर ११८८ लोकसंख्येचे रामतीर हे गाव आहे. मात्र कायम ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. पाण्यासाठी जलयुक्त शिवारासह अनेक योजना गावात राबविण्यात आल्या मात्र पाण्याअभावी कुचकामी ठरल्या आहेत. ग्रामस्थांच्या आरोग्याचे प्रश्न हे अशुध्द पाण्यापासून उद्भवतात. यावर भर देत ग्रामपंचायतीने मुलभुत सेवा योजनेंतर्गत आरओ प्रणाली वॉटर एटीएमचा जिल्ह्यातला पहिला प्रकल्प गावामध्ये बसविला.

ग्रामस्थांचे आरोग्य सांभाळणे हे एकमेव हीत डोळ्यासमोर ठेऊन ग्रामपंचयातीने या प्रकल्पाची उभारणी केली. ताशी दोन हजार लिटर क्षमतेच्या या जलशुध्दीकरण प्रकल्पातून अवघ्या पन्नास पैशातून एक लिटर पाणी ग्रामस्थांना दिले जाते. सात लाख रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्पामध्ये तासाला दोन हजार लिटर शुध्द पाणी उपलब्ध होते. यासाठी पाच हजार क्षमतेची टाकी बसविण्यात आली असून, यामधून अशुध्द पाण्याचा पुरवठा प्रकल्पासाठी होतो. सॅण्ड फिल्टरद्वारे पाण्यातील गढुळपणाा काढण्यात येतो, कार्बन फिल्टरमधून पाण्याचा वास, रंग काढण्यात येतो. फिल्टरमधून निसटलेले सुक्ष्मकण काढून टाकण्यासाठी मायक्रॉन कार्ट्रीज मॉडेल वापरण्यात आले आहे. अॅण्टी स्केलन डोसिंग युनिटद्वारे आरओ मेंबरेनवर क्षाराचे स्तर जमा होण्यास प्रतिबंध केले जातात. अल्ट्रा व्हायोलेट निर्जंतूकीकरण यंत्रणेमधून शुध्दीकरण झालेले पाणी दोन हजार लिटर क्षमतेच्या स्टेनलेस स्टीलच्या टाकीमध्ये साठविले जाते.

ग्रामस्थांनी एटीएम कार्ड उपकरणात टाकताच पाच लिटर पाणी ग्राहकाच्या भांड्यामध्ये जमा होते. ग्रामस्थांच्या आरोग्याचे हीत डोळ्यासमोर ठेऊन रामतीर ग्रामपंचायतीने जलशुध्दीकरण प्रकल्प जिल्ह्यात प्रथमच उभा करुन वॉटर एटीएमचा आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्यातील अन्य ग्रामपंचायतींनीही याची प्रेरणा घेऊन 'शुध्द पाणी आरोग्याची हमी' हे घोषवाक्य प्रत्यक्षात आणण्यास हरकत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

लग्न समारंभाला थंड पाण्याची मागणी
रामतीर ग्रामपंचायतीने लग्न समारंभासाठी शंभरवर वीस लिटरचे जार घेतले आहेत. तालुक्यातील अनेक गावामधून लग्न समारंभासाठी थंड व शुध्द पाण्यासाठी ग्रामपंचायतीत बुकींग केली आहे. यामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीसाठी मोठी मदत होत असल्याचे बोलले जाते.  

गावातील नागरिकांना शुध्द व थंड पाणी मिळावे हे स्वप्न होते. स्वप्न साकार झाल्याने आनंद वाटतोय आणि आजारपणाची धावपळ कमी झाली, असे सामाजिक कार्यकर्ते केवळ आहिरे यांनी सांगितले.   

आरओ प्रणालीमुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढीसाठी मदत झाली आहे. तसेच नागरिकांना फक्त पन्नास पैशात लिटरभर थंड पाणी मिळत आहे, असे रामतीरच्या सरपंच कलाबाई आहिरे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com