कारागृहांमधील सीसीटीव्ही फुटेजची चाचपणी

Sakal-Impact
Sakal-Impact

नाशिक/औरंगाबाद - नाशिकरोड कारागृहातील डॉ. बळीराम शिंदेचा मृत्यू व त्यातील सुदाम मुंडेच्या कथित सहभागाच्या वृत्तांमुळे राज्याचे कारागृह प्रशासन हादरले आहे. अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शनिवारी तातडीने औरंगाबादच्या हर्सूल कारागृहाची पाहणी केली. शिंदेच्या मृत्यूची वेळ, तसेच मुंडेला मिळणारी बडदास्त या बाबींशी संबंधित दोन्ही मध्यवर्ती कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजवर गृह खात्याने लक्ष केंद्रित केले आहे.

या प्रकरणातील व्हीसल ब्लोअरने माहितीच्या अधिकाराखाली या आधीही सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ते फुटेज नष्ट केले असावे, असा संशय आहे. सातारा येथील सामाजिक कार्यकर्त्या व लेक लाडकी अभियानाच्या प्रमुख ऍड. वर्षा देशपांडे यांनीही त्या फुटेजच्या आधारे सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर, गृह खात्यात हे फुटेज तपासण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कळ्यांचा मारेकरी तुरुंगातही मोकाट या शनिवारच्या सकाळमध्ये प्रकाशित वृत्तानंतर कारागृह प्रशासनात खळबळ उडाली, तर मृत्यूची मालिका व फितूर साक्षीदार या रविवारच्या वृत्ताने पोलिस यंत्रणा हादरली. डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शनिवारी दिवसभर औरंगाबाद येथील कारागृहामधील बराकींची पाहणी केली. नाशिक रोडवरून 5 मे 2017 रोजी हलविण्यात आलेला सुदाम मुंडे सध्या त्याच कारागृहात आहे. विशेषत: कैद्यांना मोबाईल व अन्य सुविधा पुरविल्या जात आहेत का, याकडे डॉ. उपाध्याय यांचे लक्ष होते, असे सांगण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात ज्यांच्या भूमिकेची खूप चर्चा आहे, असे औरंगाबाद विभागाचे तुरुंग उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे यांनी मात्र यासंदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला.

न्यायालयीन चौकशी करा - ऍड. वर्षा देशपांडे
नाशिक रोड कारागृहातील डॉ. बळीराम शिंदे याचा मृत्यू व त्यातील डॉ. सुदाम मुंडे याच्या कथित सहभागाच्या प्रकरणात तुरुंग प्रशासनाने एकतर ढिलाई दाखविली असावी किंवा अशारीतीने गंभीर गुन्ह्यांमधील कैद्यांच्या जीविताविषयी मुंडेसोबत हातमिळवणी असावी, असा आरोप "लेक लाडकी' अभियानाच्या ऍड. वर्षा देशपांडे यांनी केला आहे. अवैध गर्भलिंगचाचणी व स्त्रीभ्रूण हत्यांशी संबंधित सगळ्याच मृत्यूंची सीबीआय अथवा न्यायालयीन चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.

या सामाजिक अपराधांविषयीची सरकारी यंत्रणेची उदासीनता चव्हाट्यावर आल्याचे सांगून ऍड. देशपांडे यांनी अनेक कळीचे प्रश्‍न उपस्थित केले आहेत. परळी येथे गर्भातल्या कळ्यांचा कत्तलखाना उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने सरस्वती व सुदाम मुंडे दाम्पत्याचा वैद्यकीय परवाना रद्द केला होता. तरीही कारागृहात मुंडेला डॉक्‍टर म्हणून प्रतिष्ठा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई का झाली नाही? मुळात मुंडेचा खटलाच बीड जिल्ह्याबाहेर चालविण्याचा पोलिस अधीक्षकांचा अहवाल असताना नाशिकवरून पुन्हा त्याला औरंगाबादला का हलविण्यात आले? सहआरोपींचे मृत्यू, साक्षीदारांना धमक्‍या वगैरे बाबी एक षडयंत्र आहे, याची दखल का घेण्यात आली नाही? कारागृह अधीक्षकाच्या बदलीचं नेमकं कारण काय? 2 मार्च 2017 चे रात्री 10.45 ते पहाटे 1.40 या वेळेतील सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे, अशी विचारणा ऍड. देशपांडे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com