जैताणेत अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी

jaitana atal vishwakarma sanman yojana news
jaitana atal vishwakarma sanman yojana news

निजामपूर-जैताणे (धुळे) : राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत अटल विश्वकर्मा सन्मान योजनेच्या माध्यमातून चार जुलै ते चार ऑगस्टपर्यंत असंघटित बांधकाम कामगारांसाठी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातील धुळे व नंदुरबार जिल्ह्यांसह राज्यातील रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, वाशीम आदी अकरा जिल्ह्यांचाही समावेश आहे. त्याअंतर्गत मंगळवारी (ता.24) दुपारी दोनला जैताणे (ता.साक्री) ग्रामपंचायत कार्यालयात सुमारे 50 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली.

सरपंच संजय खैरनार, ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, नोंदणी अधिकारी ए.बी. भामरे, लिपिक मोहनिश भामरे, दिनेश अहिरे, अरविंद मोरे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे, लिपिक यादव भदाणे, प्रदीप भदाणे, योगेश बोरसे आदींच्या प्रमुख उपस्थितीत बांधकाम कामगार हासरथ गवळे या लाभार्थ्याला प्रथम नोंदणी कार्ड देण्यात आले. सरकारी कामगार अधिकारी (धुळे) कार्यालयाचे दुकाने निरीक्षक तथा नोंदणी अधिकारी ए. बी. भामरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना असंघटित बांधकाम कामगारांनी राज्य शासनाच्या या कल्याणकारी योजनेत नावे नोंदवून शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्य योजना, आर्थिक सहाय्य योजना व सामाजिक सुरक्षा योजना आदी 28 योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. सरपंच संजय खैरनार यांनी ग्रामपंचायतीतर्फे गावातील अशा सर्व गरजू बांधकाम कामगारांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी 18 ते 60 वर्षे वयोगटातील कामगारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी नोंदणी फी 25 रुपये असून पाच वर्षांकरिता या योजनेची दरमहा वर्गणी केवळ एक रुपये ठेवण्यात आली आहे. एकूण 85 रुपयांत नोंदणीकृत सर्वसामान्य असंघटित बांधकाम कामगारांना हे सुरक्षा कवच लाभणार आहे. लोकप्रतिनिधी, कामगार संघटना व आस्थापना, स्वयंसेवी संस्था यांनी विशेष नोंदणी अभियानात सहभागी होऊन जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. इमारत व इतर बांधकामाच्या व्याख्येत सुमारे 50 कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्या सर्व कामांवरील बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी करू शकतात. योजनेच्या अधिक माहितीसाठी प्रत्येक जिल्हा कामगार कार्यालयाशी व  धुळे/नंदुरबार जिल्ह्यासाठी : (02562) 283340 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणीकरिता आवश्यक कागदपत्रे...
गेल्या वर्षभरात 90 किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा, छायाचित्रासह ओळखपत्र पुरावा, बँक पासबुकची सत्यप्रत, पासपोर्ट आकाराची तीन छायाचित्रे आदी कागदपत्रे.

या कामांचा इमारत व इतर बांधकामांच्या व्याख्येत समावेश आहे...
बांधकाम कामगारांच्या कष्टाच्या सन्मानासाठी व त्यांच्या उद्याच्या आनंदासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. इमारत व इतर बांधकामाच्या व्याख्येत इमारत, रस्ते, मार्ग, रेल्वे, ट्रॉमवेज, एअर फिल्ड, पाटबंधारे, जलनिस्सारण, बंधारे, नॅव्हीगेशन, पूर, टॉवर, कुलिंग टॉवर इत्यादी, नियंत्रण, धरणे, कालवे, जलाशय व जलप्रवाह, तेल व वायूच्या वाहिन्या, विद्युत वाहिन्या, बोगदे, पूल, सेतू व पाईपलाईन या कामाचे बांधकाम, फेरफार, दुरुस्ती, देखभाल किंवा पाडून टाकणे इत्यादी कामांचा समावेश आहे. याशिवाय इतरही 21 कामांचा बांधकामाच्या व्याख्येत समावेश करण्यात आलेला आहे. त्यात दगडकाम (कापणे, फोडणे, चिरडणे), लादी किंवा फरशी काम (कापणे किंवा पॉलिश करणे), रंगकाम व सुतारकाम, नाले बांधणी व प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन इतर आणि विद्युतकाम, अग्निशमन यंत्रणेचे काम, वातानुकूलित यंत्रणेचे काम, लिफ्ट आणि स्वयंचलित जिन्याचं काम, सुरक्षा उपकरणाचं काम, धातूच्या फॅब्रिकेशनचे काम (दरवाजे, खिडक्या, ग्रील इत्यादी), जलसंचयन व इतर काम, काचेशी संदर्भात काम (कापणे, बसवणे इत्यादी), विटांचे आणि कौलांचे काम, सौर उर्जेशी निगडित काम, स्वयंपाक घरातील आधुनिक उपकरणांचे काम, सिमेंट काँक्रीटशी निगडित काम (साचेबद्ध काम), खेळ मैदान आणि जलतरण तलावाचे काम, माहितीफलक, सिग्नल, बसस्थानके आणि प्रवासी निवारे इत्यादी बांधणे, उद्यानातील कारंजे इत्यादी बांधणे, सार्वजनिक उद्याने, पादचारी पथ इत्यादींचे बांधकाम या कामांचाही समावेश आहे.

नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी पुढील कल्याणकारी योजना आहेत...
१. शैक्षणिक सहाय्य योजना...
नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यास 1ली ते 7वी साठी 75% हजेरी असल्यास प्रतिवर्षी 2500/- रुपये, व 8वी ते 10वी साठी 5000/- रुपये एवढे शैक्षणिक आर्थिक सहाय्य. 10 वी, 12वी मध्ये 50% वा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10 हजार रुपये एवढे प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य. 11वी व 12वी च्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी 10 हजार रुपये एवढे शैक्षणिक सहाय्य. दोन पाल्यांस वा पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचे प्रवेश, पुस्तके इत्यादीसाठी प्रतिवर्षी 20 हजार रुपये एवढे शैक्षणिक सहाय्य. दोन पाल्यांस अथवा पत्नीस वैद्यकीय शिक्षणासाठी प्रतिवर्षी 1 लाख व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 60 हजार रुपये एवढे शैक्षणिक सहाय्य. शासनमान्य पदवी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 20 हजार व पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रतिवर्षी 25 हजार रुपये एवढे शैक्षणिक सहाय्य. एमएससीआयटी संगणक शिक्षणासाठी प्रतिपूर्ती शुल्क दिले जाईल.

आरोग्य योजना...
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत विविध प्रकारच्या आजारांच्या उपचारांसाठी वैद्यकीय लाभ. कामगारास अथवा त्याच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपये एवढे वैद्यकीय सहाय्य. कामगारास 75% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये अर्थसहाय्य. कामगारच्या पत्नीस दोन जिवंत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसूतीसाठी 15 हजार व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी 20 हजार रुपये अर्थसहाय्य. कामगाराने अथवा त्याच्या पत्नीने एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे 18 वर्षासाठी 1 लाख रुपये मुदत बंद ठेव. व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचारासाठी 6 हजार रुपये अर्थसहाय्य.

आर्थिक सहाय्य योजना...
नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा कामावर असताना अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला 5 लाख रुपये अर्थसहाय्य. नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबास 2 लाख रुपये अर्थसहाय्य. घरखरेदी वा घरबांधणीसाठी बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील 6 लाख रुपयांपर्यंत व्याजाची रक्कम अथवा 2 लाख रुपये अर्थसहाय्य मंडळामार्फत मिळेल. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2 लाख रुपये अर्थसहाय्य. मृत्यू झाल्यास नामनिर्देशित वारसदारास अंत्यविधीसाठी 10 हजार रुपये अर्थसहाय्य. मृत्यूनंतर त्याच्या पत्नीस अथवा पतीला सलग पाच वर्षे 24 हजार रुपये अर्थसहाय्य. स्वतःच्या पहिल्या विवाहासाठी 30 हजार रुपये अर्थसहाय्य. मध्यान्ह भोजन योजना राबविणे.

सामाजिक सुरक्षा व अन्य योजना...
नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना व्यक्तिमत्त्व विकास पुस्तक संच. बांधकामाची उपयुक्त व आवश्यक अवजारे खरेदीसाठी 5 हजार रुपये अर्थसहाय्य. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व सुरक्षा विमा योजना लागू करणे. सुरक्षेसाठी 'सुरक्षा संच' व 'अत्यावश्यक वस्तू संच' पुरविणे. पूर्व शिक्षण ओळख (आरपीएल) प्रशिक्षण योजना लागू करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com