चौथ्या दिवशीही जळगावचा पारा 44 वर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

जळगाव - शहरातील तापमान चार दिवसांपासून 44 अंश सेल्सिअसवर स्थिर असून, असह्य उष्णतेच्या झळांमुळे अनेकांना त्रास जाणवू लागला आहे. 

जळगाव - शहरातील तापमान चार दिवसांपासून 44 अंश सेल्सिअसवर स्थिर असून, असह्य उष्णतेच्या झळांमुळे अनेकांना त्रास जाणवू लागला आहे. 

राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद जळगावात दरवर्षी होत असून, यंदा देखील उष्णतेची लाट कायम आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानाची तिव्रता जाणवू लागली आहे. यामुळे घराबाहेर निघणे देखील असह्य होवू लागले आहे. मागील आठवड्यात पारा चाळीसच्यावर गेल्यानंतर सलग चार दिवसांपासून 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद जैन इरिगेशनच्या हवामान विभागात होत आहे. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढलेल्या तापमानामुळे अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्णतेचा त्रास अनेकांना जाणवू लागला आहे. या त्रासापासून बचाव करण्यासाठी थंडपेय पिण्यावर भर दिला जात आहे. 

उष्माघात कक्ष 
जिल्ह्यात तापमान दरवर्षी 44-45 अंशापर्यंत पोहचत असते. या असह्य तापमानामुळे दरवर्षी उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद होत असते. यंदा देखील पारा 44 अंशावर असून, उष्णतेचा त्रास होवून जिल्ह्यात यंदा तीन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. यामुळे उन्हात फिरल्यानंतर उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यानंतर रूग्णाला तात्काळ उपचार मिळावे. यादृष्टीने जिल्हा रूग्णालय व महापालिकेच्या शाहू महाराज रूग्णालयात उष्माघात कक्ष तयार करण्यात आला आहे. जिल्हा रूग्णालयात अतिदक्षात विभागातच कक्ष तयार करण्यात आला असून, उष्माघाताच्या रूग्णांकरीता सलाईन, आईस पॅक, अत्यावश्‍यक औषधांची सुविधा करण्यात आलेली आहे.