BDO आत्महत्येचा प्रयत्न : आठजणांविरूद्ध अॅट्रासिटीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

मधुकर वाघ यांनी जबाबात सांगितले आहे, की "मी माझ्या कर्तव्यात कसुर करून यांना फायदा व्हावा यासाठी यांनी माझ्यावर दबाव आणला होता. "

चाळीसगाव (जि. जळगाव) : येथील पंचायत समितीतील गटविकास अधिकारी मधुकर काशिनाथ वाघ यांनी गुरुवारी (ता. 2) आपल्या दालनात विषय घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या घटनेने आज गंभीर वळण घेतले आहे. यासंदर्भात रात्री उशिरा श्री. वाघ यांच्या जबाबावरून पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती यांच्यासह आठ जणांविरोधात "ऍट्रासिटी'चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत माहिती अशी की, मधुकर वाघ यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दोन दिवसांपासून ते जबाब देण्याच्या परिस्थितीत नसल्याने काल (ता. 4) रात्री उशिराने त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला. त्यावरुन पंचायत समितीच्या सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, सभापतींचे पती दिनेश बोरसे, पंचायत समितीचे सदस्य कैलास निकम, सुनील पाटील, ग्रामसेवक संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष व वडगाव लांबेचे ग्रामविस्तार अधिकारी संजीव निकम, पंचायत समितीतील कनिष्ठ प्रशासन अधिकारी के. बी. मालाजंगम, सहाय्यक प्रशासन अधिकारी आर. डी. महिरे या आठ जणांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मधुकर वाघ यांची सुसाईड नोट विचारात घेऊन तसेच कालच्या जबाबानुसार पोलिस प्रशासनाने हा गुन्हा दाखल केला आहे. मधुकर वाघ यांनी जबाबात सांगितले आहे, की "मी माझ्या कर्तव्यात कसुर करून यांना फायदा व्हावा यासाठी यांनी माझ्यावर दबाव आणला होता. वेळोवेळी धाक दाखवून माझ्या कामात अडथळे निर्माण करून मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती'. या जबाबावरुन वरील आठही जणांवर गुन्हा दाखल झाल्याने तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी काल (ता.4) नाशिक विभागीय उपायुक्त सुखदेव बनकर यांनी 32 जणांचे जबाब नोंदवले होते. या जबाबाची जबाबाची उलट तपासणी होणार आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :