पिंपळवाडला बिबट्याकडून बैलाचा फडशा

बिबट्या
बिबट्या

पिलखोड (ता. चाळीसगाव) : गिरणा परिसरात थैमान घातलेल्या बिबट्याचे पशुसंहाराचे सत्र सुरुच ठेवले आहे. बुधवारी (ता. 20) रात्री बिबट्याने पिंपळवाड म्हाळसा (ता. चाळीसगाव) शिवारात बैलाचा फडशा पाडला असून वरखेडेला घोड्यावर हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे.

शेतात कामाचे दिवस...
पिंपळवाड म्हाळसा (ता. चाळीसगाव) शिवारात बिबट्याने हल्ला केल्याची ही तिसरी घटना आहे. येथे वासरु आणि महिलेनंतर आता बिबट्याने खिलारी बैलाचा फडशा पाडला आहे. धर्मा ओंकार पाटील हे पिंपळवाड म्हाळसा येथील रहिवासी आहेत. त्यांचे शेत हे वरखेडे खुर्द रस्त्यावर टेकडीलगत आहे. बुधवारी (ता. 20) रात्रीच्या सुमारास बिबट्याने त्यांच्या बैलावर हल्ला करत फडशा पाडला. यात बिबट्याने बैलाच्या घशावर हल्ला करत ठार केले आहे. आज सकाळी धर्मा पाटील हे नेहमीप्रमाणे शेतात गेले असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. दरम्यान, वन विभागातर्फे घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला आहे. तर दुसरी घटना वरखेडे (ता. चाळीसगाव) गावातील टेकडी वस्तीत दोन दिवसांपुर्वी घडली. गाळण (ता. पाचोरा) येथून पोटापाण्यासाठी आलेल्या मेंढपाळ कुटुंबियांच्या घोड्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे कळते. बिबट्याने घोड्यावर प्राणघातक हल्ला चढवला होता. हल्ल्यात घोडा जखमी झाला असून त्याच्या अंगावर बिबट्याने नखांनी ओरखडल्याच्या खूणा आहेत. दरम्यान या हल्ल्यामुळे पुन्हा परिसर भीतीमय झाला आहे.

सध्या शेतात कामाचे दिवस सुरु आहेत. अनेक ठिकाणी कपाशी वेचणी सुरु आहे. मात्र, शेत शिवारात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमुळे मजुर शेतात जाण्यास सपशेल नकार देत आहेत. तर काही ठिकाणी मजुर काम करीत असतांना देखरेखीसाठी अतिरिक्त दोन लोक ठेवावे लागत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ देखील सोसावी लागते आहे. त्यामुळे वन विभागाने ज्या भागात जास्त भीतीचे वातावरण आहे, अशा ठिकाणी दिवसा वन कर्मचाऱ्यांची गस्त वाढवावी. अशी मागणी परिसरातल्या शेतकऱ्यांनी केली आहे.

वन विभागाला अपयश...
दोन महिन्यांपासून बिबट्या वन विभागाच्या हातावर तुरी देऊन फिरत आहे. पिंजरे लाऊनही हल्ले सुरुच आहेत. शिवाय भीतीचे वातावरण ही दिवसेंदिवस वाढत आहे. नर व पशुसंहार करणारा बिबट्या अद्यापही पिंजऱ्याआड होत नसल्याने वन विभागाला अपयशाला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांचाही संताप वाढला आहे.

वनमंत्र्यांना भेटणार...
परिसरातल्या बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांवर ठोस उपाययोजना व्हावी. यासाठी गिरणा परिसरातल्या शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार असल्याचे काही शेतकऱ्यांनी 'सकाळ'ला सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com