चाळीसगाव : पिलखोड शिवारात बिबट्यासाठी लावला पिंजरा

शिवनंदन बाविस्कर
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

वन विभागाकडून उपाययोजना; बिबट्याने वासरावर हल्ला करून केले ठार

पिलखोड (ता. चाळीसगाव) :  शिवारात मंगळवारी (ता. 5) बिबट्याने वासरावर हल्ला करुन त्याला ठार केल्याची घटना घडल्यानंतर काल (ता. 6) सायंकाळी वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्यासाठी पिंजरा लावला.

येथील शेतकरी नामदेव सुकदेव बाविस्कर यांच्या शेतात मंगळवारी (ता. 5) बिबट्याने वासरावर हल्ला करुन त्याला ठार केले. काल (ता. 6) सकाळी नामदेव बाविस्कर यांचा मुलगा समाधान बाविस्कर हा शेतात गेला असता, हा प्रकार निदर्शनास आला. बिबट्याने वासराचा मागचा भाग पुर्णपणे खाल्लेला होता. या घटनेची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

वन विभागाने लावला पिंजरा...
सायगाव व काकळणे भागात केलेल्या हल्ल्यानंतर बिबट्याने आपला मोर्चा पिलखोड शिवाराकडे वळविला आहे. गेल्या आठवड्यात पिंपळवाड म्हाळसा येथे वासराला बिबट्याने ठार केले. हि घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. 5) पिलखोड शिवारात वासराला ठार केले. या भागातील अनेक शेतकऱ्यांना व शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. यामुळे या भागात भीती निर्माण झाली आहे. 

त्यामुळे येथील शिवारात आज वनवरक्षक प्रकाश पाटील, प्रवीण पाटील, वनमजूर बाळू शितोळे, नाना सोनवणे, श्रीराम राजपुत यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पिंजरा लावला. पिंजऱ्यात बकरीचे पिलू ठेवण्यात आले आहे. यासाठी सरपंच डिगंबर पाटील, नामदेव बाविस्कर, बापुराव बाविस्कर, अरविंद मोरे, एकनाथ माळी, साहेबराव रामकुवर, दिलीप देवरे, पोपट पाटील, गोकुळ माळी, प्रमोद पाटील, जिभाऊ रामकुवर, गोरख बाविस्कर, पुंजाराम पवार, मुकुंदा बाविस्कर यांच्यासह इतर ग्रामस्थांनी सहकार्य केले.