चाळीसगावात कांद्याला सर्वाधिक भाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

गेल्या दोन वर्षांपासून कांद्याच्या लिलावाचा घेण्यात आलेला अभिनव प्रयोग यशस्वी होत असून, आजच्या लिलावात राज्यातील सर्वाधिक भावाची नोंद करण्यात आली.

चाळीसगाव : येथील बाजार समितीच्या आज झालेल्या कांदालिलावात तालुक्‍यातील शिंदी येथील शेतकऱ्याचा लाल कांद्याला राज्यातील आजच्या कांदा लिलावातील सर्वाधिक 3 हजार 800 रुपये भाव मिळाला. बाजार समितीच्या कांदा लिलावास यामुळे झळाळी आली असून आज सव्वाशे ट्रॅक्‍टर कांद्यांची नोंद करण्यात आली. 

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आठवड्यातून चार दिवस कांद्याचा लिलाव होतो. गेल्या दोन वर्षांपासून कांद्याच्या लिलावाचा घेण्यात आलेला अभिनव प्रयोग यशस्वी होत असून, आजच्या लिलावात राज्यातील सर्वाधिक भावाची नोंद करण्यात आली. शिंदी येथील अनिल आवारे या शेतकऱ्याच्या लाल कांद्याला 3 हजार 800 रुपये क्विंटल भाव मिळाला.

हा भाव चाळीसगाव बाजार समितीत गेल्या अडीच ते तीन वर्षांपासूनच्या लिलावातील सर्वाधिक भाव असल्याने उत्तर महाराष्ट्रासह पश्‍चिम महाराष्ट्रात चाळीसगाव येथील कांदा लिलावास शेतकऱ्यांची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. नव्या कांद्याच्या तुलनेत जुन्या कांद्याची अधिक अवाक झाल्याने व त्यातच त्याची चांगली प्रतवारी असल्याने हा उच्चांकीचा भावाने खरेदी करण्यात आल्याची माहिती व्यापारी मुकेश चौधरी यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: jalgaon marathi news chalisgaon onion rates agri market