जळगावच्या विकासासाठी तत्काळ शंभर कोटी : गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

जळगाव: हुडको, जिल्हा बॅंकेचे सहाशे कोटी रूपयांचे कर्ज असल्यामुळे त्याची फेड न झाल्याने जळगाव महापालिका आज विकास कामे करण्यास असमर्थ ठरत आहे. त्यामुळे जळगावच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ शंभर कोटी रूपये मंजूर केले आहेत. लवकरच हा निधी प्राप्त होईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली. जळगाव येथे महात्मा गांधी उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

जैन उद्योगसमुह व जळगाव महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी उद्यानाचा नूतनीकरणाचा लोकर्पण सोहळा आज (सोमवार) करण्यात आला. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, आमदार चंदूलाल पटेल, माजी मंत्री सुरेशदादा जैन, महापौर ललीत कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, जिल्हाधिकारी किशोरराजे निबांळकर, जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, स्थायी समिती सभापती वर्षा खडके उपस्थित होते. जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी बोलतांना जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले, 'आज महात्मा गांधी यांच्या विचाराने चालण्याची गरज आहे. विकासाच्या बाबतीत कुणीही राजकारण करू नये. जळगाव महापालिकेची आर्थिक परिस्थीती बिकट असल्यामुळे विकास कामे ठप्प आहेत. मुख्यमंत्र्यांनी अगोदरच जळगावच्या विकासाला 25 कोटी दिले आहेत, मात्र, त्यांच्या कामासाठी तब्बल तीन वर्षे विलंब लागला.त्यामुळ पुढचा निधी मिळाला नाही. मात्र, आता त्या रकमेतून विकास कामाचे नियोजन केले असल्याचे आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले. विकासासाठी शंभर कोटी रूपये द्यावे अशी आपण मागणी केली, त्यांनी ही मागणी मान्य केली असून येत्या काही दिवसात जळगावच्या विकासासाठी हा निधी उपलब्ध होईल. त्यातून रस्ते तसेच इतर कामे करण्यात येतील. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी विकासासाठी राजकीय जोडे बाहेर काढावेत असे अवाहन केले. आमदार सुरेश भोळे यांनी विकासासाठी सर्व पक्षानी एकत्रीत येवून काम करावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अगोदर महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने जळगावात महापालिकेपासून सदभावना यात्रा काढण्यात आली. यात शाळकरी विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले होते.