२५ कोटींची कामे मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे

२५ कोटींची कामे मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे

जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावच्या विकासासाठी दिलेल्या २५ कोटीच्या निधीच्या कामांची यादी अंतिम मंजुरीसाठी नाशिक विभागीय आयुक्ताकडे पाठविण्यात आली आहे. त्यांच्याकडून मंजुरी आल्यास निविदा प्रक्रिया करून तीन महिन्यात कामांना सुरवात करण्यात येईल, अशी माहिती खानदेश विकास आघाडीचे नेते व माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ कोटींच्या निधीचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र विरोधी भाजपच्या नगरसेवकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. याबाबत नगरसेवकांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली. त्यांच्याकडेही तक्रार केली आहे. सर्व नगरसेवकांच्या वॉर्डात समान निधी वाटप करावा, अशी भाजप नगरसेवकांची मागणी आहे. 

निधीबाबत बोलताना लढ्ढा म्हणाले, की निधीच्या कामाचे नियोजन सर्व समान करण्यात आले आहे. यात कोणावरही अन्याय करण्यात आलेला नाही. रस्त्यासाठी केवळ १० कोटी रूपयांचा निधी आहे. त्यामुळे तो विभागण्यात आलेला आहे. ज्या नगरसेवकाच्या प्रभागात अमृत योजनेअंतर्गत कामे होणार आहेत. त्या नगरसेवकांच्या प्रभागात रस्त्याच्या विकासाची कामे टाकण्यात आलेली नाहीत. त्यात भाजपचे नगरसेवकही आहेत. त्यामुळे त्यांचा गैरसमज झालेला आहे. केवळ शहराचा विकास आणि निधीचा योग्य विनियोग हा विचार ठेवूनच निधीतून प्रभागनिहाय कामे घेण्यात आली आहेत. त्यामुळे यावर आक्षेप घेणे योग्य नाही. अगोदरच याला विलंब झालेला आहे. जर आणखी विलंब झाला तर त्याचा विनियोग होणे कठीण असून नवीन निधीही उपलब्ध होणार नाही.

ती महिन्यांत काम सुरू 
काम सुरू करण्याच्या बाबतीत लढ्ढा म्हणाले, की निधीच्या कामाचे योग्य वाटप झाले आहे. त्याला कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे विभागीय आयुक्ताकडून त्याला मंजुरी मिळेलच याची खात्री आहे. त्यांनी मंजुरी दिल्यानंतर त्या कामाच्या निविदा काढण्यात येतील. त्यात दीड महिना जाईल, निविदेला मंजुरी व प्रत्यक्ष ऑर्डर देईपर्यंत दीड महिना जाईल, त्यामुळे तीन महिन्यात कामाला सुरवात होईल. यामुळे निश्‍चित जळगाव शहरातील प्रत्येक भागातील रस्त्यांची कामे होतील.

आता मंजुरीची प्रतीक्षा
कामाच्या मंजुरीबाबत लढ्ढा म्हणाले, की पंचवीस कोटींच्या निधीचे नियोजन करून तो मंजुरीसाठी नाशिक विभागीय आयुक्ताकडे पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी हे महापालिकेचे प्रभारी आयुक्त आहेत. त्यामुळे दोन्ही अधिकारी यावर चर्चा करून लवकरच मंजुरी देतील, याचीच आता प्रतीक्षा आहे. 

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ कोटी निधीतून सर्व नगरसेवकांच्या प्रभागांत समान निधीचे वाटप व्हावे, अशी आमची अपेक्षा आहे. या निधीतून आता तातडीने कामे सुरू करून शहराचा विकास करावा. हा निधी खर्च झाल्यास नवीन निधीही आपण मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून आणणार आहोत.
- सुरेश भोळे, आमदार, जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com