गाळेधारकांच्या कारला गाडेगाव घाटात अपघात

गाळेधारकांच्या कारला गाडेगाव घाटात अपघात

जळगाव - जळगाव- औरंगाबाद महामार्गावर गाडेगाव घाटात होंडा अमेझ कारला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याची घटना आज सकाळी आठपूर्वी घडली. अपघातात चालकासह कारमधील चार जण जखमी झाले आहेत. कारचा चुराडा झाला असून, जखमींना तत्काळ सुप्रिम इंडस्ट्रीज आणि शासनाच्या रुग्णवाहिकेद्वारे येथे उपचारार्थ हलविण्यात आले. चौघांपैकी दोघांना गंभीर दुखापती झाल्या असून, प्रकृती धोक्‍याबाहेर आहे. अपघात झालेल्या वाहनात शहरातील गाळेधारक होते. औरंगाबाद येथे कायदेशीर सल्ला घेण्यासाठी जाताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला.

महापालिकेने २८ पैकी १८ व्यापारी संकुलांतील गाळे ताब्यात घेण्याचा निकाल नुकताच औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी (२६ जुलै) दिला आहे. गेल्या पाच वर्षांपासून न्यायिक लढा देत असलेल्या व्यापारी संकुलांतील गाळेधारक औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयाने हवालदिल झाले असून, व्यापार वाचविण्यासाठी त्यांनी धावपळ सुरू केली आहे. १८ पैकी १४ गाळेधारकांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आज काही गाळेधारक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी वेगवेगळ्या वाहनांनी सकाळी सातला औरंगाबादकडे निघाले होते. पावणेआठच्या सुमारास गाळेधारकांच्या वाहनांपैकी होंडा अमेझ कारचालक (एमएच १९, बीजे ७८१८) गाडेगाव घाटात वाहनास ओव्हरटेक करीत असतानाच समोरून भरधाव येत असलेल्या ट्रकने (एमएच २०, सीटी २०६७) जोरदार धडक दिली. अपघातात  हितेश दिनेशचंद्र शहा (वय ३८, रा. प्रतापनगर), फिरोज सलीमखान भिस्ती (२९, रा. शाहूनगर, भिस्तीवाडा), आशुतोष शेट्टी (३६) आणि चालक अमोल नारायण मराठे (२८, रा. इच्छादेवी चौक) जखमी झाले. रस्त्यावरील इतर वाहनधारकांनी जखमींच्या मोबाईलवरून संबंधितांना कळविले, तर मदतीसाठी रुग्णवाहिका व पोलिसांनाही बोलाविण्यात आले. सुप्रिम इंडस्ट्रीजची एक आणि शासकीय रुग्णवाहिकेतून जखमींना जळगावात रवाना केले. वेगवेगळ्या रुग्णालयांत जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींचे जाबजबाब घेतल्यानंतर नेरी येथील पोलिस दूरक्षेत्रात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

महामार्गावर वाहतूक ठप्प 
जळगाव- औरंगाबाद महामार्गावर जळगावपासून अवघ्या वीस किलोमीटरवरील गाडेगाव घाटातच उतारावर अपघात झाल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. महामंडळाच्या बस, खासगी वाहनांच्या दोन्ही बाजूंना रांगा लागल्या होत्या. काही वाहनधारकांनी जखमींना बाहेर काढले. पोलिस आणि रुग्णवाहिकेची मदत मिळवण्यासाठी जो- तो प्रयत्न करीत होता.

जिल्हाधिकारी ‘राजें’चे शतशः आभार!
दोन्ही वाहनांपैकी उशिरा निघालेल्या एका वाहनाचा अपघात झाल्याने अपघातग्रस्त वाहनातील जखमींचा मोबाईल घेत एकाने राजेश कोतवाल यांच्या मोबाईलवर दूरध्वनीवरून संपर्क करून अपघाताची माहिती देत जखमींची नावे सांगितली. कोतवाल यांचे वाहन तोपर्यंत सिल्लोडपर्यंत पोहोचले होते. त्यांनी तत्काळ घडलेली घटना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना कळविली. डॉ. शांताराम सोनवणे यांनी इतर गाळेधारकांना अपघाताची माहिती देत मदतीसाठी गाडेगावला जाण्याचे सांगितले. जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी जिल्हा रुग्णालयाची यंत्रणा सतर्क करून, शहरातील विविध डॉक्‍टरांना मदतीचे आवाहन केले. घटनास्थळ आणि जखमींची माहिती घेत पुन्हा कोतवाल यांच्याशी संपर्क करून त्यांना मदत मिळाली आहे. आपण निश्‍चिंत राहा, अशी खात्री केल्याने आम्ही सर्व पुढच्या प्रवासाला निघालो. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेतून काळजीवाहू ‘राजा’प्रमाणे प्रत्यय आणून दिला. खरच ते ‘राजे’ आहेत, अशी भावना पुढे गेलेल्या पथकातील डॉ. सोनवणे व कोतवाल यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

पोलिसांसह गाळेधारक गाडेगावला
डॉ. शांताराम सोनवणे, राजेश कोतवाल, ॲड. मंडोरा, संजय पाटील, दिलीप दहाळ, वसीम काझी यांना त्यांचे वाहन सिल्लोडला थांबवून जखमींना मदतीसाठी जळगावमध्ये संपर्क करून मदत मागवली. पोलिसांसह दोनशे- तीनशे गाळेधारक मिळेल त्या वाहनाने गाडेगावला पोहोचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com