दुचाकीस्वाराला सिग्नल तोडणे पडले महागात

दुचाकीस्वाराला सिग्नल तोडणे पडले महागात

जळगाव - सिग्नल बंद असतानादेखील वाहनधारक सर्रास रस्ता ओलांडत असल्याचे चित्र शहरातील विविध चौकांमध्ये दररोज पाहायला मिळते. असाच प्रकार आज सकाळी पावणेबाराच्या सुमारास टॉवर चौकात घडला. दुचाकीस्वार सिग्नल तोडून रस्ता ओलांडत असताना चारचाकीवर आदळून अपघात झाला. यात दुचाकीस्वाराच्या डोक्‍याला मार लागला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र पाटील हे शिवाजी पुलाकडून जुन्या बसस्थानकाकडे त्यांची कार (एमएच १९, बीजे १७७१) घेऊन जात होते. टॉवर चौकात त्यांच्या बाजूचा सिग्नल सुटलेला असल्याने ते रस्ता पार करत होते. त्याच वेळी महापालिका इमारतीकडून येणाऱ्या मोपेड दुचाकीस्वाराने (एमएच १९, बीआर ०८४८) सिग्नल तोडून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पाटील यांची कार समोर आल्याने दुचाकीस्वार कारवर धडकले. या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्‍याला इजा झाल्याने त्याला त्वरित जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

दुचाकीस्वार दोन फुटांवर उडाला
दुचाकीस्वार त्याच्या बाजूचा सिग्नल बंद असूनही रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात होता. तर सिग्नल सुटल्याने कारचालक रस्ता ओलांडत होते. यावेळी कारच्या पुढील बाजूस दुचाकी जोरात धडकली. यात दुचाकीस्वार दोन फुटावर उडून कारच्या वर जाऊन पलीकडच्या बाजूला पडला.

वाहतूक पोलिस, नागरिकांची धाव
टॉवर चौकात पावणेबाराला मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने त्याचवेळी हा अपघात झाला. अपघात होताच मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. यावेळी वाहतूक पोलिसांसह नागरिकांनी जखमी दुचाकीस्वाराला तातडीने उचलून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून कार पोलिस ठाण्यात जमा केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com