अजिंठा-जळगाव चौपदरीकरणाचे काम लवकरच - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

जळगाव - औरंगाबादहून येताना अजिंठ्यापर्यंतचा रस्ता सुस्थितीत आहे, मात्र अजिंठा ते जळगाव रस्त्याची अवस्था बिकट आहे. त्यासंदर्भात संबंधित मक्तेदाराला तातडीने दुरुस्तीसह चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याबाबत आदेश दिले आहेत, अशी माहिती राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. 

जळगाव - औरंगाबादहून येताना अजिंठ्यापर्यंतचा रस्ता सुस्थितीत आहे, मात्र अजिंठा ते जळगाव रस्त्याची अवस्था बिकट आहे. त्यासंदर्भात संबंधित मक्तेदाराला तातडीने दुरुस्तीसह चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याबाबत आदेश दिले आहेत, अशी माहिती राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. 

गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री म्हणून त्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष होत असल्याने रखडलेल्या कामांबाबत माध्यमांमधून टीका होत असून, त्यामुळे सरकारची प्रतिमा नकारात्मक तयार होत आहे. त्यावर ‘डॅमेज कंट्रोल’ म्हणून श्री. पाटील यांनी बुधवारी (ता. ८) रात्री पत्रकारांशी वार्तालाप केला. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात पूर्ण झालेल्या, प्रगतिपथावरील तसेच प्रस्तावित कामांचा आढावा पालकमंत्र्यांच्या वतीने प्रशासनाने सादर केला. त्यानंतर श्री. पाटील यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अप्पर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके आदी उपस्थित होते. 

अजिंठा मार्गाची दुरवस्था 
औरंगाबादहून येताना अजिंठा ते जळगावपर्यंत रस्त्याच्या दुरवस्थेचा अनुभव पालकमंत्र्यांनीही आज घेतला. हा रस्ता खूप खराब असून, त्याच्या दुरुस्ती व चौपदरीकरणाची ८०० कोटी खर्चाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यासंबंधी ‘न्हाई’च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रस्त्याचे काम ज्या मक्तेदारास देण्यात आले आहे, त्याला थेट आदेश देऊन त्वरित काम सुरू करण्याबाबत सांगितल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. 

महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामाला विलंब झाल्याचे मान्य करत श्री. पाटील म्हणाले, की या कामासाठी भूसंपादन पूर्ण झाले आहे. आता हे काम प्रत्यक्ष सुरू झाले असून, पाळधी व मुक्ताईनगर येथील भोकरदरी येथून कामाची सुरवात झाली आहे. दीड वर्षात मक्तेदाराला हे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, या कामाच्या प्रगतीवर आपण स्वतः लक्ष ठेवणार आहोत, असे ते म्हणाले. 

महापालिकेच्या समस्या सोडविणार
महापालिकेसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या २५ कोटींच्या खर्चाचा विषय मार्गी 
लागला आहे. त्यातून दहा कोटींचे एलईडी दिव्यांचे जाळे व अन्य कामे होतील. त्यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल.

गाळ्यांच्या करारप्रश्‍नी उच्च न्यायालयात प्रकरण सुरू आहे. त्याआधारे त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. हुडकोच्या एकरकमी कर्जफेडीबाबत कालच हायकोर्टात सुनावणी होऊन याप्रकरणी मुंबई डीआरटीने दोन महिन्यांत निर्णय देण्याचे आदेश मिळाल्याने हा विषयही दोन महिन्यांत मार्गी लावला जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

३२ हजार कि.मी. रस्ते होणार
राज्यातील २२ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग केले असून, त्यासाठी १ लाख ६ हजार कोटींची तरतूद केंद्रीय परिवहन विभागाने केली आहे; तर १० हजार किलोमीटर रस्त्यांसाठी अतिरिक्त १० हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे. जानेवारीपासून अशा एकूण ३२ हजार किलोमीटर रस्त्यांचे काम हाती घेण्यात येईल, असे श्री. पाटील म्हणाले.

एक लाख शेतकऱ्यांची ‘ग्रीन’ यादी
जळगाव - शेतकरी कर्जमाफीच्या यादीत कुठलाही घोळ नसून, एक लाख शेतकऱ्यांची ‘ग्रीन यादी’ तयार आहे. त्यासाठी संबंधित बॅंकांकडे तीन हजार ४०० कोटी रुपये वर्गही केले आहेत, अशी माहिती महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. 

जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून बुधवारी (ता. ८) सायंकाळी येथे ते आले असता पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफीच्या याद्यांमध्ये घोळ असल्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, की या योजनेत पात्र ठरणारा एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही. सरकारचा हेतू शुद्ध आहे, म्हणूनच या योजनेसाठी ३४ हजार कोटींची तरतूद व त्यासाठी २० हजार कोटींचे बजेटही तयार करण्यात आले आहे. 

नवे वाळू धोरण लवकरच
अवैध वाळू उपशाबाबत प्रश्‍न उपस्थित केला असता श्री. पाटील यांनी नव्या वाळू धोरणाबाबत माहिती दिली. या नव्या धोरणानुसार वाळू उपसा व वाहतुकीच्या नियम, तरतुदींमध्ये बदल असेल. ज्या गावातील शिवारातून वाळू उपसा होईल, त्यातून प्राप्त महसुलातून त्या गावांना २५ टक्के निधी विकासासाठी देण्याची या धोरणात तरतूद आहे, असेही त्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांचा प्रतिस्पर्धी नाही
नाना पटोले यांच्या ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, की चंद्रकांत पाटील?’ या वक्तव्याबद्दल छेडले असता जोपर्यंत मुख्यमंत्र्यांना या संदर्भात काही वाटत नाही, तोपर्यंत मला काळजी करण्याचे कारण नाही. मी मुख्यमंत्र्यांचा प्रतिस्पर्धी नाहीच, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.