दुचाकीच्या धडकेनंतर चित्रा चौकात मारहाण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

जळगाव - चित्रा चौकात दुचाकीचा धक्का लागल्यावरून हाणामारी झाली. अपघाताला कारणीभूत असताना समोरच्या वयस्क व्यक्तीस तरुणाने मारहाण केली. जखमी शाहूनगरातील नुरानी मशिदीचे सेवेकरी असून, विनाकारण मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्यानंतर संशयिताच्या दिशेने धाव घेताच त्याने पळ काढला.

चित्रा चौकात आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास मागून दुचाकीस्वाराने कट मारण्याच्या नादात दुसऱ्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार याकूब खान दाऊद खान (वय ४०) पडले. त्याला जाब विचारण्यापूर्वीच दुचाकीस्वार तरुणाने त्यांच्यावर हल्ला चढवत फायटरने मारहाण केल्याने ओठ व कपाळावर जखमा झाल्या आहेत. हा प्रकार बघितल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी विनाकारण मारहाण करणाऱ्या तरुणाच्या दिशेने धाव घेतली. त्याने दुचाकी सोडून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने धाव घेतली. मात्र, मारेकरी पळून जाण्यात यशस्वी ठरला. शहर पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून, मारहाण करणाऱ्याचे नाव अन्वर खान तकबीर खान पिंजारी (रा. ममुराबाद) असे आहे. शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह प्रत्यक्षदर्शी त्याच्या मागावर धावल्यानंतर त्याने पळ काढत थेट जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठले. तेथे आपल्या बाजूने तक्रार देत याकूब बांगी नावाच्या व्यक्तीने शिवीगाळ केल्याची तक्रार दिली असून, त्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी याकूब खान यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, हद्द कोणत्या पोलिस ठाण्याची म्हणून रात्री पोलिस ठाण्यात त्यांचा जबाब नोंदवला गेला नव्हता. मारहाण करणारा तरुण सरकारी वकिलाच्या वाहनावर चालक असल्याची माहिती मिळाली.