पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची सोनसाखळी लंपास

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची सोनसाखळी लंपास

जळगाव - शहरात गेल्या आठ दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, पुन्हा सोनसाखळी चोरीची घटना घडली. साने गुरुजी कॉलनीत पत्ता विचारण्याचा बहाणा करून चोरट्यांनी आज सकाळी अकराच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोनसाखळी लंपास केली. शहरात सलग चौथी घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटना थांबविण्यासह चोरटे पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. दरम्यान, आजच्या घटनेत चोरटे ‘सीसीटीव्ही’त कैद झाले आहेत. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पारखनगरातील सुनीता अनिल वर्मा या घराजवळील भाजीपाला दुकानावर आज सकाळी सव्वाअकराला गेल्या होत्या. भाजीपाला खरेदी करून घराकडे परतताना मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांना कागदावरील पत्ता विचारला. संधी पाहताच गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावून चोरटे काव्यरत्नावाली चौकाकडे पसार झाले. दरम्यान, महिलेने आरडाओरड केली. घटनेची माहिती कळताच रामानंदनगर पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. याप्रकरणी सुनीता शर्मा यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

टोळी बाहेरील असल्याचा अंदाज
शहरात मागील आठ दिवसांत सहा सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. घरफोड्यांचे सत्र थांबल्यानंतर आता सोनसाखळी चोरट्यांनी अचानक डोके वर काढले आहे. सोनसाखळ्या लांबविणारी ही टोळी बाहेरील जिल्ह्यातील किंवा राज्याबाहेरील असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. याबाबत पोलिस प्रशासनाने सर्व पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

सलग चौथी घटना
शहरात गुरुवारी दीड तासात शिरसोली नाका, गणेश कॉलनीतील पेट्रोलपंप, नेरीनाक्‍यावरील पार्श्‍वनाथ एजन्सी ठिकाणी तीन महिलांच्या महिलांच्या सोनसाखळ्या लांबविल्याच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, आज सकाळी पुन्हा चोरट्यांनी पारखनगरात महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोनसाखळी लांबविली.

परिसरातील फुटेजची तपासणी
पारखनगरात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवून चोरटे काव्यरत्नावली चौकाकडे ‘धूम स्टाइल’ने दुचाकीवर पसार झाले. या घटनेबाबत रामानंदनगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरटे या फुटेजमध्ये दिसून आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com