दीड तासात तीन सोनसाखळ्या तोडून चोरटे पसार

दीड तासात तीन सोनसाखळ्या तोडून चोरटे पसार

जळगाव - शहरातील नेहरू चौकदरम्यान काल सोनसाखळी लांबविल्याची घटना ताजीच असतानाच आज सायंकाळी सोनसाखळी तोडण्याच्या तीन घटना घडल्या. मेहरुण तलावाजवळ सायंकाळी सातला, गणेश कॉलनी ख्वाजामियाँ दर्ग्याच्या अलीकडे साडेसातला आणि आठ वाजता नेरीनाका परिसरात चोरट्यांनी एकामागून एक तीन महिलांच्या सोनसाखळी तोडून पोबारा केला. मेहरुण तलावाजवळील घटनेत महिलेने स्वत:च्या वाहनाने चोरट्यांचा पाठलाग केला, तर गणेश कॉलनीत एका तरुणाने चोरट्यांच्या दुचाकीचा पिच्छा पुरविला मात्र ते निसटून जाण्यात यशस्वी ठरले. गेल्या तीन-चार महिन्यांपासून सोनसाखळी तोडण्याचे गुन्हे थांबले असताना अचानक चोरटे सक्रिय झाल्याने खळबळ उडाली आहे. 

पहिली घटना - शिरसोली रोड
मेहरुण तलावाजवळील लेक प्राइड रेसिडेन्सीमध्ये वास्तव्याला असलेल्या ज्योती विद्याधर नेमाने (वय २५) ही गृहिणी शिरसोली नाका चौकातील डी-मार्ट येथून खरेदी करून सायंकाळी सव्वासातला आपल्या दुचाकीने (एमएच १९ बीयु ३५२१) घराकडे परतत असताना दुचाकीवर मागून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळपोत ओढून तोडली व ट्रकला ओव्हरटेक करीत शिरसोलीच्या दिशेने सुसाट वेगात पळ काढला. 

दुसरी घटना - गणेश कॉलनी
घटना घडल्यावर रामानंदनगर, औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यांचे पथक घटनास्थळांवर पोचले इतक्‍यात गणेश कॉलनी रोडवर ख्वाजामियाँ दर्ग्याजवळ नाल्यावर दुसरी घटना सायंकाळी ७.४५ वाजता घडली. नंदनवन कॉलनी येथील रहिवासी गृहिणी प्रमिला दिलीप चौधरी (वय-५५) विसनजीनगरातील गणपती मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या, दर्शनानंतर रिक्षाने त्या घराकडे परतल्या. मुख्य रस्त्यावर रिक्षातून उतरताच काही क्षणातच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोनपैकी एक २८ ग्रॅम वजनाची पोत तोडून गणेश कॉलनीच्या दिशेने पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे डीबी पथकासह अधिकारी घटनास्थळावर धडकले. 

तिसरी घटना - नेरीनाका परिसर
या घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू असतानाच नेरीनाका परिसरात रात्री ८.१५ मिनिटांनी तिसरी घटना घडली. भाविका सुमीत लोढा (वय-२८, पहूरपेठ ता.जामनेर) या अयोध्यानगरात माहेरी आल्या असून घरगुती साहित्य खरेदीसाठी नेरीनाका येथील दुकानात आल्या होत्या. तेथून दुचाकीने (एमएच १९ एजी ३४३२) घराकडे परतत असताना त्यांच्या गळ्यातील दोन तोळे (४०ग्रॅम) वजनी मंगळपोत तोडून दुचाकीवरील चोरट्यांनी पोबारा केला.

चेन स्नॅचिंगचा ‘क्‍वेश्‍चन मार्क’
दुचाकीस्वार चोरट्यांनी अवघ्या दीडच तासात सलग तीन गुन्हे केले आहेत. तिघा घटनांमध्ये एकच टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. तिन्ही घटनास्थळांचे पोलिसांनी अवलोकन केले असता नकाशावर क्वेश्‍चन मार्कचे (प्रश्‍नचिन्ह) चित्र तयार होते. पहिली घटना शिरसोली मार्गावरील लेकप्राईड रेसिडेन्सीजवळ सव्वासात वाजता घडल्यावर चोरटे शिरसोली रस्त्याने सुसाट पळून जात त्यांनी हॉटेल ग्रेपीज्‌च्या शेजारून मोहाडी रस्त्याकडे वळण घेतले, तेथून बहिणाबाई उद्यान रिंगरोडने जात गणेश कॉलनीत पावणेआठ वाजता आणि तेथून थेट अर्ध्या तासानंतर नेरीनका परिसर असा प्रश्‍नचिन्हाचा आकार चोरट्यांनी पूर्ण केला आहे. औद्योगिक वसाहत पोलिसांचे डीबी पथक, जिल्हापेठचे पथक या मार्गावरील सिसीटीव्ही कॅमेरांचा शोध घेत फुटेज संकलनाचे काम सुरू होते.

दोन ठिकाणी पाठलाग 
ज्योती नेमाने यांना गळ्यावर हाताचा स्पर्श होताच, काही क्षणात त्यांना गळ्यातील पोत तोडल्याचे दिसले. त्याच गाडीवर त्यांनी चोरट्यांचा घरापर्यंत पाठलाग केला. मात्र, दोघेही पळून जाण्यात यशस्वी ठरले. दुसऱ्या घटनेत नंदनवन कॉलनीतील रहिवासी प्रमिला चौधरी यांच्या गळ्यातील पोत तोडल्यावर एका महाविद्यालयीन तरुणाने चोरट्यांचा गणेश कॉलनीपर्यंत पाठलाग केला, मात्र तेथूनही ते पळून गेले.

शिरसोली रोड : सायंकाळी ७:१५ वाजता (१० ग्रॅम)
गणेश कॉलनी : सायंकाळी ७:४५ (२८ ग्रॅम)
नेरी नाका : रात्री ८:१५ (४० ग्रॅम)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com