आई निघाली वैरिणी; पोटच्या मुलाला रस्त्यावर टाकून केले पलायन!

दीपक कच्छवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

सापडलेले बाळ हे कुणी फेकले व याचे मातापिता कोण याचा तपास सुरू केला आहे. लवकरात लवकर या बाळाची प्रकृती चांगली झाली की त्याला जळगाव येथे बालसंगोपन केंद्रात रवानगी करण्यात येणार आहे.
- दिलीप शिरसाठ, साहाय्यक पोलीस निरीक्षक, मेहुणबारे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव, जि. जळगाव): 'स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी' असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे. कारण आईची महिमा तशीच आहे. आई स्वतः दुःख भोगते व आपल्या मुलांना त्याचा त्रास होऊ देत नाही. मात्र, दुसरीकडे एका निर्दयी मातेने आपल्या सात दिवसाच्या बाळाला सिमेंटच्या गोणीत बांधुन रस्त्याच्या कडेला मोरीत टाकून पलायन केल्याची घटना चाळीसगाव-धुळे रस्त्यावरील खडकी फाट्याजवळ घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 'माता न तू वैरिणी' याचा प्रत्यय ग्रामस्थांना आला आहे.

मेहुणबारे गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकी फाट्यावर 30 सप्टेंबरला (शनिवारी) दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास चाळीसगाव येथील वेल्डिंग काम करणारे हमीद शेख, अफीद शेख व त्यांचा मित्र सय्यद अलीम सय्यद रहीम (रा. घाटरोड चाळीसगाव) हे दोघे मोटरसायकलवरून खाजगी कामासाठी धुळे येथे जात होते. त्यांना खडकी फाट्यावरील छोट्या पुलाजवळ लहान बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. त्यांनी तेथे गाडी थांबवली व आजुबाजुला कुठे काही आहे का ते पाहीले. ते पुलाच्या खाली गेले असता त्यांना सिमेंटच्या गोणीतून बाळाचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी आजुबाजुला असलेल्या शेतातील शेतकऱ्याना बोलवत हमीद शेख यांनी ती सिमेंटची गोणी बाहेर आणली व त्यात पाहिले तर चक्क बाळ आढळले. तसेच तो मुलगा असल्याची खात्री झाली.

बाळ केले पोलिसाच्या स्वाधीन..
हामीद शेख व सय्यद शेख यांनी त्या बाळाला गोणीत काढले. त्याच्या अंगाला लागलेल्या मुंग्या व बाळाचे होणारे हाल पाहुन या दोघांनी त्या बाळाला मेहुणबारे पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल गोरख चकोर, दीपक पाटील व पंकज पाटील यांनी स्वखर्चाने बाळाला कपडे व दुध आणले. मात्र, बाळाची प्रकृती खराब झाल्याने त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. संतोष सांगळे यांनी उपचार केले. तसेच या बाळाला काचेच्या पेटीत ठेवावे लागणार असल्याने त्यास पुढील उपचारासाठी डॉ. सांगळे यांनी पत्र लिहून धुळे येथे पाठविले आहे. मेहुणबारे पोलिसांच्या निगराणीत बाळाचे उपचार सुरू आहेत.

बाळासाठी अनेक जण सरसावले...
बाळाला स्वीकारण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले असून, बाळाचे पालन पोषण व सांभाळ करण्याची तयारी दर्शवली आहे.

दैव बलवत्तर...
मुलगा व्हावा यासाठी देवाला साकडे घातले जाते, तरी काहींना मुलगा होत नाही. किंबहुना काहींना पुत्रसुख देखील अनेकवेळा मिळत नसल्याचे आपण बघतो. परंतु, या फेकुन दिलेल्या बाळाची जन्मदात्या मातेने नाळ तर तोडली होती. मात्र, दैवाने ती सोडली नाही. असाच प्रकार या बाळाच्या बाबतीत घडला आहे.