'सिव्हिल'मधील सुविधा 'आयसीयू'त  !

राजेश सोनवणे, जळगाव
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

भारतासारख्या विकसनशील व मोठ्या लोकसंख्येच्या देशात सर्वाधिक खर्च आरोग्य व शिक्षणसेवेवर होत असताना या दोन्ही सेवांबाबत भारत बराच मागास आहे. एकतर आरोग्य, वैद्यकीय आणि शिक्षणसेवेबाबत सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या थेट नागरिकांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचत नाहीत. शासकीय आरोग्यसेवा तर चुकीच्या नियोजनामुळे कमालीची प्रभावित झाली आहे. जळगाव जिल्हा रुग्णालयातील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. रुग्णालयातील अस्वच्छतेचा प्रश्‍न पूर्वीपासूनच बिकट आहे. दिवसभरात शेकडो नागरिकांची ये- जा असून, प्रशासनाचेही याकडे फारसे लक्ष नसल्याने स्वच्छता दुरापास्तच झाली आहे.

भारतासारख्या विकसनशील व मोठ्या लोकसंख्येच्या देशात सर्वाधिक खर्च आरोग्य व शिक्षणसेवेवर होत असताना या दोन्ही सेवांबाबत भारत बराच मागास आहे. एकतर आरोग्य, वैद्यकीय आणि शिक्षणसेवेबाबत सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या थेट नागरिकांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचत नाहीत. शासकीय आरोग्यसेवा तर चुकीच्या नियोजनामुळे कमालीची प्रभावित झाली आहे. जळगाव जिल्हा रुग्णालयातील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. रुग्णालयातील अस्वच्छतेचा प्रश्‍न पूर्वीपासूनच बिकट आहे. दिवसभरात शेकडो नागरिकांची ये- जा असून, प्रशासनाचेही याकडे फारसे लक्ष नसल्याने स्वच्छता दुरापास्तच झाली आहे. रुग्णालयातील अंतर्गत अस्वच्छतेमुळे दाखल रुग्ण व नातेवाईक उग्र दर्पाने त्रासले आहेत. खिडक्‍यांची तावदाने कचराकुंड्या बनली असून, जणू काही रुग्णालयालाच अस्वच्छतेचा आजार जडल्याचे चित्र आहे.

जिल्हा रुग्णालयात दिवसभरात हजार ते दीड हजार बाह्यरुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयातील विविध वॉर्डांतून सातशेवर रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णालय स्वच्छतेसाठी पूर्वी वॉशिंग पावडरसह फिनाईलचा वापर केला जात होता. रुग्णालयातील स्वच्छतागृहे, प्रत्येक वॉर्डातील फरशी फिनाईलने नियमित पुसली जात होती. परिणामी रुग्णालयातील उग्र वास नाहीसा होत होता. सद्यःस्थितीत फरशी पुसण्यासाठी फिनाईलचा वापरच होत नसल्याने रुग्णालयात दुर्गंधी पसरलेली आहे. रुग्णालयात दाखल रुग्णाला भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांना चक्क प्रवेशद्वारापासूनच नाका-तोंडाला रुमाल बांधूनच आता यावे लागते. 

खिडक्‍याच कचराकुंड्या 
वॉर्डात गोळा होणारा कचरा फेकण्याची कोणतीही सोय येथे उपलब्ध नाही. वॉर्डात ठेवलेल्या कचराकुंड्याही आता दिसेनाशा झाल्या आहेत. परिणामी वॉर्डातील कचरा थेट खिडक्‍यांतून बाहेर फेकण्यात येतो. खिडक्‍यांबाहेर कुजलेले अन्नपदार्थ आणि कचरा पडलेला दिसून येतो. कुजलेल्या अन्नपदार्थांमुळे खिडक्‍यांतून अक्षरश: रोगराई डोकावत असल्याचे चित्र आहे. इतकेच नव्हे; तर जिन्याचे कोपरेही कचराकुंडीच झाले असून, रुग्णांचे नातेवाइकही येथे उरलेले अन्न, पिशव्या, कागद टाकत असल्याने प्रचंड घाण झालेली पाहावयास मिळते.

रुग्णांचेच आरोग्य धोक्‍यात
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दिवसभरात शेकडो रुग्ण येतात. यातील काही ॲडमिट होतात, तर काहींना उपचार करून सोडले जाते. परंतु, रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचेच आरोग्य अस्वच्छतेमुळे धोक्‍यात आले असल्याची स्थिती आहे. रुग्णालयातील इमारतींतील प्रत्येक कोपरा, प्रत्येक जिन्यावर गुटखा खाणाऱ्यांनी पिचकाऱ्या मारलेल्या असल्याने वॉर्डात जाण्यापूर्वी दुर्गंधीचा सामना करावा लागतो. वॉर्डात देखील जास्त वेळ थांबणे शक्‍य नसून, अशा स्थितीत रुग्णांना राहावे लागत आहे. ही समस्या गेल्या कित्येक वर्षांपासून असताना याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्षच आहे.

रुग्ण, रुग्णांच्या नातेवाइकांचे बोल... 
खासगी रुग्णालयात जाऊन तेथील खर्च पेलवला जाणार नाही, हा विचार करून कमी खर्चात उपचारासाठी ‘सिव्हिल’मध्ये येत असतो. परंतु येथे आता खूपच घाण आणि दुर्गंधी असल्याने याचा त्रास होतो. बऱ्याचदा वासामुळे डोके दुखत असून, रात्री झोपही लागत नाही. येथे रुग्णांवर उपचार होण्यासोबत स्वच्छताही व्हावी.
- सुलोचना सोनवणे (रुग्ण)

गरिबांच्या या रुग्णालयात जेथे शेकडो रुग्ण दाखल असतात तेथील स्वच्छतेकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यायला हवे. आमच्यासारख्या रुग्णांवर येथे उपचार होत असले, तरी पूर्णपणे सुविधा मिळायलाच हव्यात. बऱ्याचदा काही उपचार करायचे असल्याने रुग्णांना बाहेर जावे लागते. 
- सुनील राठोड (रुग्ण)

रुग्णांना हव्या तशा सुविधा मिळत नाहीत. अस्वच्छता असल्याने संपूर्ण इमारत परिसरातच दुर्गंधी पसरलेली असल्याने श्‍वास घेणेही कठीण होऊन बसते. तसेच ज्या पलंगावर रुग्ण आहेत त्यावरील चादरी अस्वच्छ असून, त्यांचाही कुबट वास येतो.  
- ज्योती कोळी (रुग्ण)

नातेवाइक रुग्णालयात दाखल असल्याने त्याला भेटण्यासाठी आलो. परंतु घाण अन्‌ वासामुळे येथे थांबणेही कठीण बनले आहे. रुग्णाजवळ बसून त्याची विचारपूस करण्याचीही मानसिकता होत नाही. मात्र, आपलीच व्यक्‍ती असल्याने नाकाला रुमाल लावून कसेतरी बसतो. 
- भूषण सपकाळे (रुग्णाचे नातेवाईक)

‘सिव्हिल’मध्ये उपचार चांगले मिळत असतात. यासोबतच सिटीस्कॅन मशिन सुरू झाल्यास बाहेर लागणारा खर्च टळेल. शिवाय येथील घाण, असुविधांमुळे नातलगांना पाठविण्याची इच्छा होत नाही. अगदी प्रवेशद्वारापासून उग्र वासाचा त्रास सुरू होत असल्याने आपलीही प्रकृती बिघडण्याची शक्‍यता वाटते. 
- विजय बडगुजर (रुग्णाचे नातेवाईक)

Web Title: jalgaon news civil hospital