‘लॅम्बर्गिनी’ची क्‍लोन कार ‘आरटीओ’कडून ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

जळगाव - उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने चोपडा येथे ‘इंटरनॅशनल स्पोर्ट्‌स कार’ ताब्यात घेतली आहे. कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांच्या मालकीच्या या कारची किंमत ६० लाखांच्या घरात असून, ती सहा महिन्यांपासून नोंदणीशिवायच रस्त्यावर फिरत असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांना आढळून आले. ताब्यात घेतलेल्या या कारला सोडून देण्यासाठी अनेक पुढाऱ्यांचे फोन आरटीओ जयंत पाटील यांना आले. मात्र सहा लाखांचा कर भरणा करा, त्यानंतर कार घेऊन जा, असा पवित्रा अधिकाऱ्यांनी घेतल्याने ही कार दिवसभर आरटीओ कार्यालयात उभी होती. 

आंतरराष्ट्रीय स्पोर्टस कार निर्माता कंपनीच्या लॅम्बर्गिनी सेगमेंटची स्पोर्टस कार चोपडासारख्या तालुक्‍यात फिरताना आढळून आल्याने आरटीओ अधिकारीही चक्रावून गेले. किमान २ ते ५ कोटी किंमत असलेल्या या कारचा मालक कोण असावा, या कुतूहलापोटी त्यांनी कार थांबवून माहिती घेतली. त्यानंतर पुणे येथे कार नूतनीकरणाची अधिकृत कंपनी असलेल्या दिलीप छाब्रिया यांच्या मालकीची ही कार असल्याचे निदर्शनास आले. ताब्यात घेतलेल्या देखण्या कारवर एमएच १४ टीसीआय १०० हा क्रमांक असून, सहा महिन्यांपासून ही कार फिरवली जात होती. यापूर्वी मे २०१७ मध्ये आरटीओ कार्यालयानेच ही कार पकडली, तेव्हा नुकतीच कार मॉडिफाय केली असल्याचे कारण सांगण्यात आले होते. त्यानंतर कार मालकाला अधिकृतरीत्या नोंदणी करून घेण्याची समज देऊन कार सोडली होती. मात्र, तरीही कारची नोंदणी न होताच ती रस्त्यावर धावत असल्याचे आढळून आल्याने आज आरटीओ पाटील यांच्या पथकाने कारवाई केली. आरटीओ कार्यालयाने ताब्यात घेतलेली महागडी कार, लॅम्बर्गिनी सेगमेंटची क्‍लोन कार ‘आवंती’ असून, त्यात रॅनो कंपनीचे हॅब्रीड इंजिन आहे. पुणे येथील छाब्रिया यांच्याकडे ‘आवंती’चे डिझाईन झाले आहे. कार व तिच्या डिझाईनला अधिकृत मान्यता असून, भारतीय बाजारात आवंतीची किंमत पन्नास ते साठ लाखांच्या घरात आहे.  यापूर्वी दिलेली समज आणि वाहन थांबवल्यावर अधिकाऱ्यांना तुच्छ लेखणाऱ्या कार मालकाचा तोरा पाहता आत्ताच्या आता सहा लाखांच्या वर दंड भरून कायदेशीर नोंदणी करा आणि कार घेऊन जा, असा पवित्रा आरटीओ पाटील यांनी घेतला. कार ताब्यात घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांनाही त्याची माहिती झाली होती. परिणामी रात्री उशिरापर्यंत या कारला बघण्यासाठी आरटीओ कार्यालयात गर्दी झाली होती.