पायातील महागड्या बुटांनी पडल्या हातात बेड्या

पायातील महागड्या बुटांनी पडल्या हातात बेड्या

जळगाव - भुसावळ उपविभागात एकामागून एक घरफोड्या होऊनही स्थानिक चोरट्यांचा मागमूस लागत नसल्याने गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडे होता. भुसावळ परिसरात पेरलेल्या खबऱ्यांनी कळविल्यानुसार फिल्टर हाउस परिसरातील तरुणांच्या पायात इंपोर्टेड महागडे बूट आणि राहणीमानात बदल झाल्याची कुणकुण लागताच गुन्हे शाखेच्या पथकाने दोन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्या माहितीवरून टोळीचा म्होरक्‍या ‘टेके शाब्बास’ याच्यासह सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. यात एका अल्पवयीन संशयिताचाही समावेश आहे.

भुसावळ येथील रेल्वे ऑफिसर्स कॉलनीतील रहिवासी तथा अधिकारी डॉ. सिद्धीश ईश्‍वरचंद्र जयस्वाल (वय ४७) यांच्या निवासस्थानी १७ ऑक्‍टोबरला घराचा कडी-कोयंडा तोडून १८ हजारांचा  मुद्देमाल चोरून नेला होता. भुसावळ शहरात याच प्रकारे एकामागून एक गुन्ह्यांचे सत्र सुरू होते. गुन्ह्यातील एकसमान पद्धत, घरातील रोकड, दागिने सापडले नाही तरी महागड्या वस्तूंसह मिळेल ते चोरून नेत असल्याचे आढळून आले होते. दाखल गुन्हे उघडच होत नसल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी गुन्ह्याच्या समांतर तपासाचे आदेश गुन्हेशाखेला दिले होते. त्यानुसार निरीक्षक सुनील कुराडे यांनी गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी भुसावळ बीटच्या टिमला जबाबदारी सोपवली.

पथकाने भुसावळ शहरात पेरलेल्या खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक निरीक्षक राजेंद्र होळकर, सागर शिंपी, रवींद्र पाटील, शशिकांत पाटील, राजेंद्र पाटील, सुरेश महाजन, विजय पाटील, संजय पाटील, युनूस शेख, विलास पाटील, दीपक पाटील, नरेंद्र वारुळे यांच्या पथकाने संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवत कवाडेनगर झोपडपट्टीतून आकाश भानुदास गोरखा (वय १९) यांच्यासह त्याचा मित्र अभिषेक प्रदीप भालेराव (१९) या दोघांना ताब्यात घेत महागडे लेदर जॅकेट, इलेक्‍ट्रिक साधनांसह ऐवज ताब्यात घेतला. पोलिसी पद्धतीने विचारपूस केल्यावर त्यांनी टोळीचा म्होरक्‍या आकाश रामटेके ऊर्फ ‘टेके शाब्बास’, त्याचा साथीदार आकाश रमेश परदेशी (वय २१, कवाडेनगर झोपडपट्टी) या दोघांना अटक करण्यात आली. चौघा संशयितांना वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या चौकशीत भूषण नाना राठोड (वय २२) आणि एक अल्पवयीन साथीदार अशा सहा संशयितांची टोळी निष्पन्न झाली आहे. 

प्याद्यांच्या बुटांनी गुन्हा उघड  
रेल्वेकॉलनी व त्या शेजारील झोपडपट्टीत राहणारे हे तरुण म्हणजे ‘टेके शाब्बास’चे प्यादेच. त्यांच्या राहणीमानात अचानक बदल झाला व तो खबऱ्यांच्या नजरेत टिपला गेला. सफाई कर्मचारी व मजुरांच्या पोरांच्या पायात रिबॉक, नायकी, रेडचीफ अशा ४ ते ५ हजाराच्या रेंजमधील बूट, महागडे कपडे, मोबाईल, घड्याळ चमकत असल्याने गुन्हेशाखेला खबर लागली आणि सुरवातीलाच गोरखा व अभिषेक या दोघांना अटक केल्यानंतर पाच संशयितांना अटक झाली. भुसावळ शहर परिसरातील पाच मोठ्या घरफोड्या या चोरट्यांनी कबूल केल्या असून मुद्देमाल काढून दिला आहे. उर्वरित आठ ते दहा चोऱ्यांचीही कबुली मिळाल्याचे निरीक्षक कुराडे म्हणाले.
 

दुचाकीला चोरीचे इंजिन   
मुख्य संशयित ‘टेके शाब्बास’ वापरत असलेल्या दुचाकीला (एमएच १९, एएच ३६००) दुसऱ्या दुचाकीचे (एमएच-१९ एडी८१९७) इंजिन चोरून बसविण्यात आल्याचे आढळले. दुचाकीसह टेकेच्या ताब्यातून ४० हजार ५०० रुपये रोख, दोन डिजिटल कॅमेरे, महागडी कॅमेरा लेन्स, दोन घड्याळे, सोन्या-चांदीचे दागिने असा ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com