जिल्हा बॅंकेच्या ठेवींत ४५० कोटींनी वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

जळगाव - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ठेवींत गेल्या तीन वर्षांत ४५० कोटींनी वाढ झाली असून, ठेवींचा वेग दहा टक्‍क्‍यांच्या वर असल्याचे बॅंकेच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. बॅंकेची उद्या (२२ सप्टेंबर) १०१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बॅंकेच्या आवारात सकाळी अकराला होत आहे.

जळगाव - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ठेवींत गेल्या तीन वर्षांत ४५० कोटींनी वाढ झाली असून, ठेवींचा वेग दहा टक्‍क्‍यांच्या वर असल्याचे बॅंकेच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. बॅंकेची उद्या (२२ सप्टेंबर) १०१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बॅंकेच्या आवारात सकाळी अकराला होत आहे.

जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही तिसरी सर्वसाधारण वार्षिक सभा होत आहे. बॅंकेतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे, की बॅंकेच्या नवीन संचालकपदाची निवडणूक २०१५ मध्ये होऊन ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांची चेअरमनपदी निवड १६ मे २०१५ला झाली. त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या कार्यकाळात भाग भांडवलात २१.३१ कोटीने वाढ झाली आहे. ठेवीत ४५० कोटीने वाढ झाली आहे. बॅंकेच्या ठेवीचा दर आज दहा टक्‍क्‍यांच्या वर आहे. बॅंकेच्या खेळत्या भांडवलात ६२५ कोटी रुपयांची वाढ झालेली आहे. गुंतवणुकीत ७५ कोटीने वाढ तर कर्ज येणे बाकित तब्बल ५०० कोटी रुपयांनी वाढ झालेली आहे. गत तीन वर्षात बॅंकेच्या व्यावसायिक उलाढालीत ८०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बॅंकेला ३१ मार्च२०१७च्या आर्थिक वर्षात २३ कोटी ८६ लाखाचा नफा झाला आहे.

मात्र नोटांबदीच्या काळात हजार व पाचशेच्या २१० कोटीच्या नोटा बॅंकेकडे नऊ महिने पडून राहिल्याने आर्थिक व्यवहारावर विपरीत परिणाम झाला. या शिवाय शासनाच्या कर्जमाफीच्या धोरणामुळे कर्ज वसुलीवर विपरीत परिणाम होऊ ती कमी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. बॅंकेला व्याजाची १२ कोटी ८८ लाख व कर्जाची २९ कोटी ३० लाख रुपयाची तरतुदी कराव्या लागल्या. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या धोरणामुळे बॅंकेच्या पीक कर्ज वितरणावर १० कोटी ६५ लाख रुपये व्याजाचे आर्थिक नुकसान झाले आहे. 

बॅंकेने संगणकीय प्रणालीकडे वाटचाल केल्याचे नमूद करण्यात आले असून सर्व शाखा संगणकीय करून सीबीएसी प्रणालीव्दारे काम सुरू आहे. नाबार्डच्या सहकार्याने प्रत्येक  तालुक्‍यात आर्थिक साक्षरता केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी मध्यम, दीर्घ मुदत कर्ज योजना राबविण्यात आल्या आहेत. बॅंकेने शेतकरी व ग्राहकांच्या सुविधेसाठी रूपे किसान कार्ड वितरित केले आहे.

‘बेलगंगा’, ‘वसंत’ थकबाकी वसुली विक्रीतून  
बॅंकेची बेलगंगा सहकारी साखर कारखान्याकडे ७० कोटी, तर वसंत सहकारी साखर कारखान्याकडे ७० कोटी रुपयांची थकबाकी आहे. याशिवाय जे. टी. महाजन सूतगिरणी, महापालिका यांच्याकडे कर्जाची थकबाकी आहे. त्यामुळेच बॅंकेचा एनपीए अधिक आहे. बेलगंगा कारखान्याची विक्री प्रक्रिया झाली असून त्याची रक्कम येण्याची एक महिना मुदत आहे. तर वसंत कारखान्याच्या विक्री प्रक्रियेची नवीन निविदा आता लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. या शिवाय जे. टी. महाजन सूतगिरणीकडे असलेल्या वसुलीसाठी विक्री प्रक्रिया करण्यात येणार आहे. तर महापालिकेकडे असलेली थकबाकी वसुली नियमित सुरू असून दरमहा एक कोटी रुपये बॅंकेला मिळत आहे.