डॉक्‍टर हत्येचे धागेदोरे धुळे, शिरपूरपर्यंत

डॉक्‍टर हत्येचे धागेदोरे धुळे, शिरपूरपर्यंत

जळगाव - कुष्ठरोग सहाय्यक संचालक असलेल्या डॉ. अरविंद मोरे यांची हत्या होऊन ४८ तासांचा, तर घटना उघडकीस येऊन ३६ तासांचा कालावधी उलटल्यानंतरही या प्रकरणाचा तपास ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेला नाही. असे असले तरी डॉक्‍टरांच्या हत्येचे धागेदोरे त्यांनी जळगावआधी सेवा बजावलेल्या धुळे जिल्ह्यातून मिळण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. 

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेसह रामानंदनगर ठाण्याचे संयुक्त पोलिस पथक तपासासाठी जिल्ह्याबाहेर रवाना झाले असून, बुधवारपर्यंत काहीतरी हाती लागेल, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 

जळगाव जिल्हा रुग्णालयातील कुष्ठरोग विभागात सहाय्यक संचालक म्हणून नुकताच महिनाभरापूर्वी पदभार घेतलेल्या डॉ. अरविंद सुपडू मोरे (वय ५२) यांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. पार्वतीनगरात जे. एन. पाटील यांच्या घरातील वरच्या मजल्यावर डॉ. मोरे यांनी वीस दिवसांपूर्वीच रूम भाड्याने घेऊन वास्तव्य सुरू केले होते. अवघ्या काही दिवसांपूर्वीच जळगावी आल्यानंतर थेट त्यांचा खून कसा होऊ शकतो? असा प्रश्‍न सर्वांनाच भेडसावत आहे.

संशयाची सुई धुळ्याकडे
डॉ. मोरे यांनी जळगावी पदभार स्वीकारण्यापूर्वी धुळे येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून सेवा बजावली होती. धुळ्याहूनच ते जळगावी बदलून आले, त्यामुळे या हत्येमागे धुळे येथे कार्यरत असतानाचा काही प्रकार असू शकतो काय, यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. धुळे येथे सेवा बजावताना डॉक्‍टरांचे कुणाशी मतभेद, वाद होते का, याबाबतही पोलिस चौकशी करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा व रामानंदनगर पोलिस ठाण्याची संयुक्त पथके धुळे, नाशिक जिल्ह्यात रवाना झाले असून ते विविध बाजूंनी तपास करीत असून एक पथक संशयिताच्या शोधार्थ शिरपूरपर्यंतही पोचल्याचे वृत्त आहे. 
नाशिकमध्येही चौकशी
डॉ. मोरे हे नाशिक जिल्ह्यातील दाभाडी गावचे मूळ रहिवासी. त्यांचे कुटुंबीय, आप्तेष्ट व मित्रपरिवार नाशिकलाच असतो. त्यामुळे नाशिकमधूनही काही जणांची चौकशी सुरू असल्याचे समजते. पोलिस याबाबत अधिकृतपणे माहिती देत नसले तरी डॉ. मोरे यांना शनिवार व रविवारी आलेल्या, तसेच त्यांनी केलेल्या कॉल्सच्या माहितीवरून संबंधितांची चौकशी सुरू आहे. 
रविवारी आठ ते दहाच्या सुमारास मृत्यू
डॉ. मोरे यांच्या हत्येची घटना सोमवारी (११ सप्टेंबर) सकाळी उघडकीस आली, तत्पूर्वी पंधरा तास आधी त्यांचा मृत्यू झाला असावा असा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अंदाज होता. सोमवारी रात्री सामान्य रुग्णालयात आठ-साडेआठच्या दरम्यान शवविच्छेदन झाले. त्यावेळेपासून साधारण २४ तास आधी डॉ. मोरेंचा मृत्यू झाल्याचे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले, त्यावरून डॉ. मोरेंचा मृत्यू रविवारी (१० सप्टेंबर) रात्री आठ ते नऊच्या दरम्यान झाल्याचे दिसून येते. 
आता अहवालाची प्रतीक्षा
डॉ. मोरेंची हत्या झाली त्याठिकाणचे रक्ताचे नमुने धुळे येथे चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत, तर घटनास्थळी उमटलेल्या हातापायांचे ठसे, अन्य पुराव्याच्या बाबी नाशिकच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. ‘व्हिसेरा’च्या अहवालाचीही पोलिसांना प्रतीक्षा असून, तो मिळाल्यानंतर आणखी तथ्य बाहेर येऊ शकेल. 

पोलिस तपास योग्य दिशेने सुरू आहे. अद्याप या प्रकरणात काही हाती लागले नसले तरी बुधवारपर्यंत या प्रकरणाच्या तपासात प्रगती होऊन, काहीतरी ठोस हाती लागू शकेल. पोलिस प्रकरणाच्या सर्व अंगाने माहिती घेत असून, काहीजणांची चौकशीही सुरू आहे.
- नीलोत्पल, सहाय्यक पोलिस अधीक्षक

धुळ्यात जळगावच्या पोलिस पथकाकडून चौकशी
धुळे - डॉ. अरविंद मोरे यांच्या खून प्रकरणी जळगावच्या पोलिस पथकाने आज येथील जिल्हा परिषदेत येऊन चौकशी केली. खून प्रकरणी काही धागेदोरे मिळतात का? डॉ. मोरे यांच्या खुनाशी धुळ्यातील कोणाचा संबंध आहे का? आदींबाबत पथकाने तपास केला. दरम्यान, धुळे येथे असताना डॉ. मोरे हे सतत शिरपूरच्या दौऱ्यावर असायचे असे सांगितले जाते. त्याचे रहस्य उलगडल्यास पोलिसांना काही धागेदोरे मिळू शकतात, अशी चर्चा आज जिल्हा परिषदेच्या आवारात रंगली होती.

तपास पथकात पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, राजेश घोळवे, सागर तडवी यांचा समावेश होता. या पथकाने जिल्हा आरोग्य विभागातील संगणक, काही कागदपत्रांची तपासणी केली, तसेच प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, वाहनचालक राहुल पवार यांच्यासह दोन लिपिक व काही कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. 

शिरपूरचे रहस्य गुलदस्त्यात
मोरे हे १४  जून २०१२  ते ५ जून २०१७  या कालावधीत धुळे जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. नियुक्तीच्या काळापेक्षा दोन वर्षे अधिकचा काळ त्यांना येथे मिळाला. ते येथे रुजू झाले तेव्हा अतिशय मितभाषी होते. मात्र वर्षभरानंतर ते मद्याच्या आहारी गेले अन्‌ त्यांच्या एकूणच वागण्यात प्रचंड बदल झाला. राजकीय पदाधिकारी अथवा अधिकाऱ्यांचेही फोन ते घेत नसत. घेतलाच तर आपण दौऱ्यावर आहोत, असे त्यांचे उत्तर ठरलेले होते. दौऱ्यावर आहेत, असे सांगून प्रत्यक्षात मात्र ते शिरपूरला असायचे. ते सतत शिरपूरला का असायचे, हे एक रहस्यच राहिले, ते उलगडण्याची गरज आहे. 

बदलीचा प्रस्ताव तरीही मोरे यांच्या कार्यशैलीला कंटाळून त्यांची बदली करावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनीही त्यांच्या बदलीचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला होता, तरीही कार्यवाही झाली नव्हती, उलट दोन वर्षे जास्तीचा कार्यकाळ त्यांना मिळाला होता. पाच वर्षांनंतर त्यांची जळगावला बदली झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या खुनाची घटना घडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com