घडवेलच्या बेपत्ता शिक्षकाचा तापीपात्रात आढळला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

खापरखेडा येथून घाडवेलकडे तापी पात्रातून ते जात असताना आवर्तन सोडले असल्याने अचानक नदीचा प्रवाह वाढल्याने त्यांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ते घरी व शाळेतही न पोचल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. सुरत येथील काही तरुण नदीपात्रात पोहत असताना त्यांना शिंदे यांचा मृतदेह नदीवर तरंगताना दिसला. त्यांनी ही बाब नजीकच्या गावातील ग्रामस्थांना कळवली

अमळनेर - पतोंडा (ता. अमळनेर) येथील रहिवासी व घाडवेल (ता. चोपडा) येथील निंबा नरसिंग पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक भगवान माधवराव शिंदे (वय 52) यांचा मृतदेह आज खापरखेडा तापी पात्रात आढळून आला. ही घटना सोमवारी (ता. 23) घडली असून, याबाबत पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची नोंदही करण्यात आली होती.

पंचायतराज समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते शाळेत कागदपत्रे घेण्यासाठी जात होते. खापरखेडा येथून घाडवेलकडे तापी पत्रातून ते जात असताना आवर्तन सोडले असल्याने अचानक नदीचा प्रवाह वाढल्याने त्यांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. ते घरी व शाळेतही न पोचल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. सुरत येथील काही तरुण नदीपात्रात पोहत असताना त्यांना शिंदे यांचा मृतदेह नदीवर तरंगताना दिसला. त्यांनी ही बाब नजीकच्या गावातील ग्रामस्थांना कळवली.

श्री. शिंदे यांचे बंधू चंद्रकांत शिंदे यांना ही घटना कळल्यानंतर त्यांनी धाव घेतली. त्यांचा मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. श्री. शिंदे यांच्या मागे तीन भाऊ, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पत्नीचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले आहे