उपमहापौरपदी ‘खाविआ’चे सोनवणे बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

जळगाव - महापालिकेच्या आज झालेल्या विशेष सभेत खानदेश विकास आघाडीचे उमेदवार गणेश सोनवणे यांची नवव्या उपमहापौरपदी अधिकृतरीत्या निवड करण्यात आली. भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह ‘जनक्रांती’ने पाठिंबा दिल्याने श्री. सोनवणे यांची निवड निश्‍चित होती. पीठासीन अधिकारी, जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी श्री. सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी महापालिका आवारात ढोल-ताशांचा निनाद, आतषबाजी करण्यात आली.

जळगाव - महापालिकेच्या आज झालेल्या विशेष सभेत खानदेश विकास आघाडीचे उमेदवार गणेश सोनवणे यांची नवव्या उपमहापौरपदी अधिकृतरीत्या निवड करण्यात आली. भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह ‘जनक्रांती’ने पाठिंबा दिल्याने श्री. सोनवणे यांची निवड निश्‍चित होती. पीठासीन अधिकारी, जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी श्री. सोनवणे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी महापालिका आवारात ढोल-ताशांचा निनाद, आतषबाजी करण्यात आली.
महापालिकेवर शिवसेनेचे माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली खानदेश विकास आघाडीची सत्ता आहे. भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, जनक्रांतीच्या पाठिंब्यावर नुकतीच महापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली. ‘मनसे’चे ललित कोल्हे महापौरपदी विराजमान झाले. त्यानंतर रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी आज विशेष सभा झाली.

निवडणुकीत खानदेश विकास आघाडीचे श्री. सोनवणे यांचा एकमेव अर्ज दाखल होता. या पदासाठी भाजपनेही पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध झाली. श्री. सोनवणे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आले होते. महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. मात्र, या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी खानदेश विकास आघाडीत प्रवेश केला. आघाडीतर्फे त्यांना उपमहापौरपदाची संधी देण्यात आली. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त निंबाळकर यांनी श्री. सोनवणे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृतरीत्या घोषणा केली. यावेळी महापौर ललित कोल्हे, खानदेश विकास आघाडीचे सभागृह नेते रमेश जैन, माजी महापौर नितीन लढ्ढा उपस्थित होते.

सुरेशदादांचा घेतला आशीर्वाद  
उपमहापौर निवडीनंतर सुरेशदादा जैन यांचे बंधू व खानदेश विकास आघाडीचे रमेश जैन, माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी गणेश सोनवणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. निवडीनंतर श्री. सोनवणे यांनी ‘७, शिवाजीनगर’ या सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. महापालिकेच्या सतराव्या मजल्यावरील उपमहापौरांच्या दालनात खानदेश विकास आघाडीचे गटनेते रमेश जैन, महापौर कोल्हे यांच्या उपस्थितीत नवव्या उपमहापौरपदाचा सोनवणे यांनी कार्यभार स्वीकारला.

सोनवणे अभ्यासू व्यक्तिमत्त्व - जैन
श्री. सोनवणे अभ्यासू व्यक्तिमत्त्व असून, ते गटनेते असताना त्यांचा अभ्यास आम्ही बघितला. एखाद्या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करूनच ते सभागृहात मांडत असतात. त्यांचा हा अनुभव उपमहापौरपदासाठी उपयोगी ठरून ते योग्य पद्धतीने दिलेली जबाबदारी पार पाडतील, असे खानदेश विकास आघाडीचे नेते रमेश जैन यांनी सांगितले.

आतापर्यंतचे उपमहापौर
महापालिकेची स्थापना २१ मार्च २००३ ला झाली. यात प्रथम उपमहापौर होण्याचा मान अब्दुल करीम सालार यांना मिळाला. दुसरे उपमहापौर म्हणून रमेश जैन, नंतरच्या टप्प्यात भारती सोनवणे, राखी सोनवणे, अनिल वाणी, मिलिंद सपकाळे, डॉ. सुनील महाजन, ललित कोल्हे आणि आता नववे उपमहापौर म्हणून गणेश सोनवणे यांनी आज पदभार स्वीकारला.

दिलेली संधी नक्कीच सार्थक ठरवू - सोनवणे 
सुरेशदादा जैन, रमेश जैन यांचे सर्व समाजास सोबत घेऊन चालण्याचे आधीपासून तत्त्व आहे. सुरेशदादांनी अगोदर बॅंकेत नोकरी मिळवून दिली; परंतु काही कारणास्तव ती सोडून समाजकार्यात सक्रिय झालो. खानदेश विकास आघाडीशी एकनिष्ठ राहिल्यानेच दादांनी मला पद दिले आहे. त्यामुळे ‘लाकुडतोड्याच्या हातात सोन्याची कुऱ्हाड दिल्या’सारखे आज मला भासत आहे. त्यामुळे त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्‍वास नक्कीच सार्थक ठरवून महापालिकेचा आर्थिक प्रश्‍न सोडवू, तसेच ‘अमृत’सह विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामांना निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे नवनिर्वाचित उपमहापौर गणेश सोनवणे यांनी सांगितले.

Web Title: jalgaon news dy. mayor ganesh sonawane