दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘ई-लर्निंग’

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘ई-लर्निंग’

दि पूर्व खानदेश हिंदी शिक्षण संस्था संचलित स्व. शेठ बी. एम. जैन प्राथमिक विद्यालय आणि महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची स्थापना १९५८ मध्ये म्हणजे ५९ वर्षांपूर्वी (कै.) भिकमचंद जैन यांनी केली. एक प्रगल्भ शैक्षणिक चळवळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्व खानदेश शिक्षण संस्थेने समाजाची गरज ओळखून सुरवातीला हिंदी व नंतर मराठी शाळेची स्थापना केली. तेव्हापासून शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे. सतत नवीन काहीतरी करण्याचा विद्यालयाचा ध्यास असतो. याचाच एक भाग म्हणून शाळेतर्फे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘ई-लर्निंग’ला प्रोत्साहन देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. 

गुणवत्तापूर्ण शिक्षण, नावीन्याचा ध्यास घेत विद्यार्थी घडविण्याचा वसा दि पूर्व खानदेश हिंदी शिक्षण संस्थेने हाती घेतला आहे. त्यामुळेच संस्थेच्या स्व. शेठ बी. एम. जैन प्राथमिक विद्यालय आणि महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल दरवर्षी नव्वद टक्के इतका लागतो. शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थिनींनी शाळेचे नाव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे. क्रीडा स्पर्धांसह विविध स्पर्धेत विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. विद्यालयातील माजी विद्यार्थिनी आज विदेशात उच्चपदावर नोकरी करीत आहेत. 

सुरवातीला भिकमचंदजींनी हिंदी माध्यमाची शाळा सुरू केली होती. मात्र काही वर्षानंतर मराठी शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी मराठी माध्यमाचे विद्यालय सुरू केले. विद्यालयात विद्यार्थ्यांना विविध खेळांचा सराव करता यावा, यासाठी प्रशस्त क्रीडांगण तयार केले. सोबतच विद्यार्थ्यांच्या कौशल्यात वाढ व्हावी, यासाठी स्पर्धा परीक्षा, व्याख्याने आदींसारखे विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा बोलता यावी, यासाठी वर्गात इंग्रजी बोलायला शिकविले जाते.

‘ई-लर्निंग’चा उपयोग
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विद्यालयातर्फे दररोज प्रत्येक वर्गाच्या एक ते दोन तासिका या ई-लर्निंग शिक्षण पद्धतीद्वारे घेण्यात येतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी झाले आहे. तसेच ई-लर्निंगद्वारे शिकविलेले विद्यार्थ्यांच्या लवकर लक्षात राहते.

समाजात सर्व प्रकारच्या नागरिकांची गरज असते. फक्त इंजिनिअर अथवा डॉक्‍टर होऊन उपयोग नसतो. यासाठी आम्ही समाजातील सर्व घटकातील नागरिक घडविण्याचा प्रयत्न करत असतो.
- साधना शर्मा (मुख्याध्यापिका)

प्राथमिक शिक्षण हा शिक्षणाचा मूळ पाया आहे. हा पाया पक्का व्हावा, यासाठी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांद्वारे शिक्षण देण्यात येते. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.
- भास्कर फुलपगार (मुख्याध्यापक)

आम्हाला शाळेत पुस्तके कमी आणावे लागत असल्याने खूप आनंद वाटतो. नवीन पद्धतीने शाळेत शिकायला मिळते. त्यामुळे आमच्यातील कला-गुणांना वाव मिळतो. 
- पूजा लहाके (विद्यार्थिनी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com