अजिंठा चौक पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जुलै 2017

जळगाव - शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंठा चौकाला अतिक्रमणाने गिळंकृत केले होते. त्यामुळे चौकात वाहतुकीचा खोळंबा रोज होत होता. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन अजिंठा चौकातील सर्व अतिक्रमण १९ जुलैला काढण्यात आले होते. दहा दिवसांत पुन्हा चौकात आता ट्रक, दुचाकी, चारचाकी वाहने मोकळा जागेवर उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा झाला आहे.

जळगाव - शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंठा चौकाला अतिक्रमणाने गिळंकृत केले होते. त्यामुळे चौकात वाहतुकीचा खोळंबा रोज होत होता. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन अजिंठा चौकातील सर्व अतिक्रमण १९ जुलैला काढण्यात आले होते. दहा दिवसांत पुन्हा चौकात आता ट्रक, दुचाकी, चारचाकी वाहने मोकळा जागेवर उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीला अडथळा झाला आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या अजिंठा चौकात कायम वाहतुकीची कोंडी राहत असे. आजूबाजूला असलेले अतिक्रमण तसेच महामार्गाच्या बाजूला विक्रेते, वाहने उभी राहत असत. जिल्हाधिकाऱ्यांनी वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी चौकाच्या अवतीभवती असलेले अतिक्रमण काढून चौक चार तासांत मोकळा केला. यावेळी महामार्गावर तसेच चौकात पुन्हा अतिक्रमण होऊ देऊ नका, रस्त्याच्या कडेला ट्रक, अवजड वाहनांना उभे राहू न देण्याचे आदेश दिले होते. आदेशाकडे वाहतूक व पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मोकळ्या जागेवर आता आधीपेक्षा अधिक अवजड वाहने उभी राहत असून, पुन्हा चौकात अतिक्रमण होऊ लागले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशदेखील पाळला जात नसल्याचे दिसून येत आहे.

अतिक्रमण काढलेल्या जागेवर वाहने
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने चार तासांत अजिंठा चौकातील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढले होते; परंतु या मोकळ्या जागेवर पुन्हा अवजड वाहनांसह इतर अतिक्रमण होऊ लागले आहे. याकडे मात्र वाहतूक पोलिसांकडून कानाडोळा केला जात असल्याचे दिसून येत आहे.

चौकाचे सुशोभीकरण केव्हा?
चौकाच्या चारही बाजूंचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यात आले. त्यानुसार चौक सुशोभीकरणाचा प्रस्तावदेखील महापालिकेला तीन- चार जणांनी एकत्र मिळून दिला होता; परंतु दहा दिवस होऊनदेखील चौक सुशोभीकरणाला अद्याप सुरवात किंवा मोकळा केलेल्या जागेवर रस्ता तयार करण्याची काहीच हालचाली सुरू नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता पुन्हा या जागेवर अतिक्रमण होऊ लागले आहे.

आदेशावरूनदेखील कारवाई नाही
कालिकामाता ते अजिंठा चौक तसेच औरंगाबादकडे, इच्छादेवी चौकाकडे व शहरात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला पुन्हा अवजड वाहने लागलेली असायची. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकचालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. अजूनही मोठ्या संख्येने वाहने तशीच उभी राहत असूनदेखील वाहतूक पोलिसांकडून एकाही ट्रकचालकावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्याच आदेशाला ‘खो’ दिल्याचे दिसून येत आहे.

भंगार बाजार अतिक्रमणावर कारवाई केव्हा?
जिल्हाधिकाऱ्यांनी फुले व्यापारी संकुलाच्या पाहणीदरम्यान अजिंठा चौकालगत असलेले भंगार बाजाराचेदेखील अतिक्रमण काढणार असल्याचे सांगितले होते; परंतु दहा दिवस उलटूनदेखील ही कारवाई झालेली नाही.