ओळखपत्राअभावी भावी शिक्षक परीक्षेस ‘अपात्र’

जळगाव - गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा देण्यापासून वंचित असलेले विद्यार्थी.
जळगाव - गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा देण्यापासून वंचित असलेले विद्यार्थी.

जळगाव - शासनातर्फे शिक्षकाच्या नोकरीसाठी ‘शिक्षक पात्रता’ परीक्षा देणे बंधनकारक असते. या परीक्षेसाठी आलेल्या काही विद्यार्थ्यांकडे मूळ ओळखपत्र नसल्याने, तर काही विद्यार्थी परीक्षेला उशिरा आल्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. परीक्षेपासून वंचित विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुन्हा घेतली जावी, अशी मागणी यावेळी शिक्षण विभागाकडे केली.

शिक्षकाच्या नोकरीसाठी शिक्षण विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन ‘शिक्षक पात्रता परीक्षे’ला आजपासून सुरवात झाली. या परीक्षेसाठी जिल्ह्यात गुलाबराव देवकर इंजिनिअरिंग व पॉलिटेक्‍निक महाविद्यालय हे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. याठिकाणी आज दिवसभरातून तीन सत्रांमध्ये ही परीक्षा झाली. दरम्यान,या परीक्षेसाठी जिल्ह्यासह नंदुरबार, अमळनेर, धुळे, औरंगाबाद, जालना यांसह अनेक जिल्ह्यांतून विद्यार्थी आले होते. आज सकाळी अकरा ते दुपारी बारापर्यंत काही विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन केंद्रांवर प्रवेश देण्यात आला. मात्र, काही बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना येण्यास पाच ते दहा मिनिटे उशीर झाल्याने त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाकडे आत जाऊ देण्यासाठी विनवणी केली. मात्र त्यांना प्रवेश न दिल्याने ते उदास होऊन घराकडे वळले. 

नावातील फरकामुळे विद्यार्थी वंचित
या परीक्षेचा अर्ज भरताना विवाहित महिलांनी आपल्या गुणपत्रिकेवरील नावानुसार म्हणजेच आपल्या माहेरच्या नावानुसार अर्ज भरला होता. परीक्षेला येताना ओळखपत्र म्हणून आधारकार्ड आणण्यास सांगितले असल्याने विद्यार्थिनींनी ते आणले. परंतु आधारकार्डावरील नाव हे सासरचे असल्याने नावातील फरकामुळे त्या विद्यार्थिनींना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नियमांचे पत्र ऑनलाइन देण्यात आलेले होते. परीक्षेच्या एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे होते. तसेच त्यांना दिलेल्या सूचनेप्रमाणे त्यांच्याकडे मूळ ओळखपत्र नसल्यामुळे त्यांना प्रवेश देता आला नाही.
- किरण पाटील, परीक्षा केंद्रप्रमुख

शहरात पोहोचण्यास उशीर झाल्याने तसेच परीक्षा केंद्र शहरापासून दूर असल्यामुळे या ठिकाणी पोहोचण्यासाठी उशीर झाला. परीक्षा केंद्रप्रमुखांनी विनंती करून व लेखी लिहून देण्यास तयार होतो, तरी देखील बसू दिले नाही.
- जयश्री गोसावी (नंदुरबार)

अर्जावर माहेरचे नाव आणि आधार कार्डावर सासरचे नाव होते. ओळखपत्र म्हणून पॅनकार्डची झेरॉक्‍स दाखविल्यानंतर देखील आम्हाला केंद्रप्रमुखांनी प्रवेश दिला नाही. त्यामुळे आमचे नुकसान झाले आहे.
- अर्चना चव्हाण (चाळीसगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com