दिवाळीच्या सुटीचा आनंद "गांधीतीर्थ'च्या भेटीत द्विगुणित! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

जळगाव -  "गांधीतीर्थ'चा परिसर पर्यटकांसाठी खुणावत असून, या जागतिक दर्जाच्या स्थळाला दिवाळीच्या सुटीत हजाराच्या वर पर्यटकांनी भेट दिली. आतापर्यंत गेल्या पाच वर्षांत दोन लाखांच्या वर पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. 

जळगाव -  "गांधीतीर्थ'चा परिसर पर्यटकांसाठी खुणावत असून, या जागतिक दर्जाच्या स्थळाला दिवाळीच्या सुटीत हजाराच्या वर पर्यटकांनी भेट दिली. आतापर्यंत गेल्या पाच वर्षांत दोन लाखांच्या वर पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. 

जैन हिल्स परिसरातील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाचे "गांधीतीर्थ' हे पर्यटनस्थळ आहे. परिसरातील गर्द झाडांमुळे निर्माण झालेली नैसर्गिक संपदा डोळ्यांचे पारणे फेडत आहे. त्यातच विविध रंगांची फुले मन उल्हसित करतात. यातच पावसाच्या सरी बरसल्या तर पर्यटकांना निसर्गाची अनुभूती झाल्याशिवाय राहत नाही. सिमेंटच्या जंगलात आणि वाहतुकीच्या गोंगाटात अडकलेल्या शहरवासीयांना मात्र अशा आनंदाची अनुभूती क्वचितच लाभते. पर्यटकांसाठी जैन हिल्स परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे "गांधीतीर्थ' येथे ही अनुभूती अनुभवण्यास मिळत आहे. 

दिवाळीच्या सुट्यांमध्ये वाढली गर्दी 
दिवाळीच्या सुट्यांमध्ये निसर्गरम्य ठिकाणी भटकंतीचे नियोजन अनेक जण करीत असतात. यात शांततेची आणि प्रदूषणविरहित ठिकाणांना पसंती दिली जाते. नैसर्गिक संपदा असलेल्या जैन हिल्सच्या परिसरातील "गांधीतीर्थ' हे अहिंसेसह शांततेची शिकवण देणारे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी दिवाळीच्या सुट्यांच्या निमित्ताने गांधीजींच्या विचारांचा "फराळ' घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक आले. निसर्गप्रेमींनी दिवाळीच्या सुटीचा आनंद "गांधीतीर्थ' येथे येऊन घालविला. अवघ्या तीन दिवसांत हजारो कुटुंबीयांनी येथे भेट दिली आहे. यात विदेशी नागरिकांचाही सहभाग आहे. 

आतापर्यंत दोन लाख पर्यटकांची भेट 
"गांधीतीर्थ'चे लोकार्पण झाल्यानंतर मे 2012 ते ऑक्‍टोबर 2017 दरम्यान दोन लाख 12 हजार 409 पर्यटकांनी "गांधीतीर्थ'ला भेट दिली आहे. यात सुमारे 897 विदेशी नागरिकांचाही समावेश आहे, तर सहा हजार 784 शेतकरी, 16 हजार 384 विद्यार्थी, तर विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह इतर एक लाख 90 हजार 336 पर्यटकांनी "गांधीतीर्थ'ला भेट दिली आहे.