जळगाव: वाकोदजवळ सिलिंडरच्या ट्रकचा स्फोट

fire
fire

वाकोद : येथून जवळच जळगावहून औरंगाबादकडे गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकच्या केबिनमध्ये आग लागून गॅस सिलिंडरांचा स्फोट झाल्याची घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. हा स्फोट इतका भीषण होता, की आगीच्या ज्वाळा वाकोद गावातून दिसत होत्या. 

जळगाव- औरंगाबाद महामार्गावरील वाकोद येथील ग्रामस्थ गाढ झोपेत असताना शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास निरव वातावरणात अचानक भीषण स्फोटाच्या आवाजाने ते खडबडून जागे झाले. प्रत्येक जण बाहेर येऊन पाहतो तर काय, औरंगाबादच्या दिशेने आगेच्या प्रचंड ज्वाळा दिसू लागल्या. त्यामुळे ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र घटनास्थळावरून आणखी एका स्फोटाचा आवाज झाला. त्या आवाजामुळे दचकलेले ग्रामस्थ जागच्या जागी थांबले. तोवर गॅस सिलिंडरच्या गाडीचा स्फोट झाल्याचे वृत्त ग्रामस्थांमध्ये पसरले. त्यामुळे पुढे जाण्याची हिंमत कोणामध्ये झाली नाही. पहिल्या दोन स्फोटांनंतर अजून तीन भीषण स्फोटांचे आवाज घटनास्थळावरून आले. घटनेचे वृत्त समजताच सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड आपल्या ताफ्यासह वाकोद गावाजवळ पोहोचले. त्यांनी औरंगाबादकडे जाणारी वाहतूक रोखली आणि जामनेर, जळगाव, औरंगाबाद येथील अग्निशामक दलाला पाचारण केले. जामनेरचा बंब पावणेबारापर्यंत घटनास्थळी पोहोचला. 

घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील भारत गॅस कंपनीचे सिलिंडर भरलेला ट्रक औरंगाबादकडे जात असताना वाकोदच्या पुढे काही अंतरावर केबिनमध्ये स्पार्किंग झाल्याने आग लागली. आग लागल्याचे पाहून चालक व सहचालक दोघांनी ट्रक सोडून औरंगाबादच्या दिशेने धाव घेतली. केबिनची आग भरलेल्या गॅस सिलिंडरपर्यंत पोहोचताच सिलिंडरचे एकामागून एक स्फोट झाले. मात्र रात्रीची वेळ, तुरळक वाहतूक आणि चालक, सहचालकाने आधीच सोडलेला ट्रक यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. 

गॅस सिलिंडर स्फोटाचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच जामनेर येथून जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांनी मध्यरात्री कार्यकर्त्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली. त्याचबरोबर जामनेरचे पोलिस निरीक्षक नजीर शेख ताफ्यासह घटनास्थळाकडे रवाना झाले. मंत्री महाजन घटनास्थळापर्यंत पोहोचेपर्यंत जामनेर अग्निशामक दलाच्या बंबाने तीन फेऱ्या करून मध्यरात्री पाऊणपर्यंत आग बऱ्यापैकी आटोक्‍यात आणली होती. तोपर्यंत जळगाव किंवा औरंगाबादचे अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचले नव्हते. म्हणून जामनेरचे बंब चौथ्या फेरीसाठी पाणी भरण्यासाठी रवाना झाले होते. दरम्यान, रात्री एकच्या सुमारास मंत्री महाजन घटनास्थळी ठाण मांडून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. 

वाकोदकरांची पळापळ 
दोन दिवसांपूर्वी वाकोद गावात गॅसच्या भडक्‍याने दोन महिलांचा मृत्यू ओढवला होता. या पार्श्‍वभूमीवर गाव झोपेत असताना गावाजवळच गॅस सिलिंडरच्या ट्रकचा स्फोट झाल्याची वार्ता गावात पसरली आणि ग्रामस्थांनी मुला- बाळांसह पळापळ सुरू केली. प्रत्येकाने गाव सोडून सुमारे अर्धा-पाऊण किलोमीटर लांब शेतांमध्ये सहारा घेतला. पाहता पाहता रात्री साडेबारापर्यंत संपूर्ण गाव रिकामे झाले होते.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com