गॅस सिलिंडरची वाहतूक बंदिस्त गाडीतून व्हावी!

गॅस सिलिंडरची वाहतूक बंदिस्त गाडीतून व्हावी!

...तर मोठा धोका निर्माण झाला असता
दिलीप चौबे (संचालक, रेखा गॅस एजन्सी) :
आकाशवाणी चौकात एका माथेफिरू मद्यपीने गॅस सिलिंडरच्या गाडीवर चढून स्फोट घडविण्याची धमकी दिली. त्याने असे केले असते, तर स्फोटामुळे दोन- तीन किलोमीटर परिसरात फटका बसला असता. याबाबत आयजींशी संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. असे प्रकार शक्‍यतो घडत नसून, गाडीवरील चालक आणि क्‍लिनरला गाडी कोठे उभी करायची, काय काळजी घ्यायची, याचे प्रशिक्षण दिले जात असल्याने धोके संभवण्याची शक्‍यता कमीच असते. 

बंदिस्त गाडीच्या वापरासाठी प्रयत्न 
विलास हरिमकर (जिल्हा पुरवठा अधिकारी) :
गॅस सिलिंडरच्या गाडीवर मद्यपीने चढून धमकी देणे ही घटना अतिशय धोकादायक होती. आगामी काळात अशा घटना होऊ नये, यासाठी संबंधित सर्व गॅस कंपन्यांसोबत सिलिंडर पुरवठ्यासाठी बंदिस्त गाड्यांचा वापर करण्याबाबत चर्चा केली जाईल. या चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल.

सुरक्षेसाठी उपाययोजना हव्यात
उज्ज्वला ठाकूर (ग्राहक) :
घरगुती गॅस सिलिंडरची खुल्या पद्धतीने वाहतूक ही धोकादायकच आहे. कॉलन्यांमध्येदेखील रिक्षांमधून सिलिंडर पोहचविले जातात. नकळतपणे सिलिंडर लिक झाल्यास स्फोट होण्याचा धोका असतो. याची काळजी म्हणून गाडीवर दोन व्यक्‍ती असावेत किंवा बंद गाडीतून सिलिंडर वाहतूक होणे अपेक्षित आहे. 

एजन्सीनेच सुरक्षितता जपणे आवश्‍यक 
शांताराम कोळी (ग्राहक) :
गॅस एजन्सीकडून घरपोच सिलिंडर पुरवठा करण्याची सुविधा ग्राहकांसाठी सुरू केली आहे. तसेच ग्राहकांच्या सुरक्षेसाठी एजन्सीकडून विशेष करून महिलांना प्रशिक्षण दिले जाते. त्याप्रमाणे एजन्सीने सिलिंडर पुरवठा करताना गाड्यांचीही सुरक्षितता जपणे अपेक्षित आहे. आकाशवाणी चौकात ज्या प्रकारे गॅस सिलिंडरच्या गाडीवर चढून मद्यपीने स्फोट करण्याची धमकी दिली; असे होण्याची शक्‍यता लक्षात घेता एजन्सीने नियोजन करावे.

एजन्सीसह प्रशासनाने खबरदारी घ्यावी
नंदू पाटील (ग्राहक) :
रिक्षा, ट्रकमधून सिलिंडर वाहतूक करणे म्हणजे जिवंत बॉम्ब घेऊन जाण्यासारखे आहे. वाहतूक होत असताना कोठे काय होईल; हे सांगणे कठीण आहे. शिवाय, प्रवासी रिक्षांमधून देखील घरगुती गॅसचा वापर केला जातो. यावर जिल्हा प्रशासनाने नियंत्रण करणे आवश्‍यक आहेत. खुल्या पद्धतीने सिलिंडर वाहतूक ही व्हायलाच नको. याची खबरदारी एजन्सी व प्रशासनाने करायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com