गावच्या वेशीवर सव्वा महिना राहणार आडवा ओंडका

गावच्या वेशीवर सव्वा महिना राहणार आडवा ओंडका

वडजीकरांच्या श्रद्धेला विज्ञानाची जोड; दीडशे वर्षाची परंपरा आजही अबाधीत

भडगाव (जळगाव): वडजी (ता. भडगाव) गावात आषाढच्या पहिल्या मंगळवारी गाव दरवाजात दीडशे वर्षापासून सव्वा महिन्यासाठी लाकडाचा ओडंका टाकण्याची परंपरा आहे. वडजीकरांच्या या श्रद्धेला विज्ञानाची तेवढीच भक्कम जोड असल्याचे चित्र आहे. या परंपरेचा झेंडा पुढे नेण्याचे काम गावातील तरुणाई करत आहे हे आणखी विशेष!

आषाढ महिना लागल्यावर खानदेशात भंडाऱ्यांना सुरवात होते. वडजी ( ता. भडगाव ) येथील भंडारा आगळ्यावेगळ्या कारणाने परिचित आहे. आषाढ महिन्यात गावात मंगळवारी भंडारा साजरा केला जातो. याला मोठी परंपरा आहे. ग्रामस्थ ग्रामदेवतेची पूजा करून नैवेद्य देतात. संकट दूर करण्यासाठी ग्रामदेवतेला गावागावात भंडारे साजरे करण्याची प्रथा सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार वडजी गावात पूर्वजांनी गावात रोगराई पसरू नये; या उद्देशाने गावात बाहेरील बैलगाडी, जनावरे न येण्यासाठी वेशीवर लाकडाचा ओंडका टाकण्यास सुरवात केली. हीच परंपरा आजही सुरू आहे.

वडजीचा आगळावेगळा भंडारा
भडगाव तालुक्‍यातील वडजी येथील भंडाऱ्याची वेगळीच परंपरा आहे. साधारणपणे दीडशे वर्षापुर्वी गिरणा काठावर असलेले हे गाव नदीपासून दीड- दोन किलोमीटरवर नव्याने वसले आहे. तेव्हापासून गावात आषाढच्या पहिल्या मंगळवारी भंडारा साजरा करण्याची परंपरा आहे. परंपरेनुसार सकाळी ग्रामदेवतेच्या मंदिरापासून गावात वाजगाजत मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत गावातील सर्व ग्रामस्थ सहभागी असतात. मिरवणुकीतील भगताचा पाय गावाच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पडताच दरवाजात लाकडाचा ओडंका आडवा करून वाहन, बैलगाडीसाठीला प्रवेश बंद केला जातो. गावाच्या वेशीत टाकण्यात आलेला लाकडाचा ओडंका हा आता सव्वा महिन्यापर्यंत राहणार आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी गावात मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल. त्याचदिवशी सायकांळी तमाशा कलावंताची तगतराववरून (सजवलेली बैलगाडी) मिरवणूक काढली जाते. दरवाजातून सर्वांत प्रथम बैलगाडीचा प्रवेश होतो. त्यानंतर सर्वांसाठी दरवाजातून प्रवेश खुला केला जातो.

परंपंरेला वैज्ञानिक जोड
वडजीचा भंडारा हा आगळ्यावेगळ्या परपंरेमुळे प्रसिद्ध आहे. जुन्या लोकांची या परंपरेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन असल्याचा दिसून येतो. आषाढ महिना म्हटला म्हणजे अगदी पावसाची झडी लागलेली असायची. या पावसामुळे रोगराईचे प्रमाणही वाढायचे. रोगराईचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने जुन्या लोकांनी आषाढ महिन्यात भंडाऱ्याच्या निमित्ताने गावाच्या वेशीत लाकूड टाकण्याचा निर्णय घेतला. यामुळे बाहेरून येणाऱ्या गाडीबैल, जनावरे हे गावात येणार नाहीत. पर्यायाने रोगराई येणार नाही. गावातील रोगराई नियंत्रणात येईल. असा वैज्ञानिक दृष्टिकोन यामागे असल्याचे सांगण्यात येते. तर श्रावण महिन्यात शेतीची सर्व कामे आपटून शेतकरी थोडा निवांत असतो. त्यामुळे त्याला थोडा विरूगंळा मिळवा म्हणून सव्वा महिन्यानंतर तमाशाचे आयोजन केले जात असल्याने जुने जानते सांगतात.

तरुण जपतायेत परंपरा
दीडशे वर्षापुर्वी गावकऱ्यांनी सुरू केलेली परंपरा आधुनिकतेची कास धरलेली तरूणांची पिढी तेवढ्याच आनंदाने पुढे नेत असल्याचे चित्र आहे. 'जग चंद्रावर जाते आहे. मात्र वडजीकर अजूनही वेशीत अडकले, असा सांगणारा एक वर्ग आहे. मात्र आमच्या पुर्वंजानी उदात्त हेतूने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून सुरू केलेली परंपरा पुढे नेताना अभिमान वाटत असल्याच्या प्रतिक्रिया गावातील तरूणाईकडून व्यक्त होतात. त्यांना यात कुठलीही अंधश्रद्धा वाटत नाही. उलट सर्वजण या उत्साहात आनंदात सहभागी होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com