क्रीडाप्रेमींसह धावले आबालवृद्ध!

क्रीडाप्रेमींसह धावले आबालवृद्ध!

जळगाव - गुलाबी थंडी, मंद वाऱ्याची झुळूक, अशा आल्हाददायक वातावरणात क्रीडाप्रेमींसह अबालवृद्ध आज भल्यापहाटेच ‘खानदेश रन’साठी घराबाहेर पडले. हौशी धावपटूंसह हजारो जळगावकरांनी सागर पार्क मैदानावर येऊन ‘वॉर्मअप करीत ‘एनर्जी’ निर्माण केली. त्यानंतर उत्साह अन्‌ जल्लोषात मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.     

जळगाव रनर ग्रुपमधील सदस्य अगदी न चुकता दर रविवारी पहाटे धावत असतात. पण, संपूर्ण जळगावकरांना धावण्यासाठी आज ‘खानदेश रन’चे आयोजन करून एक वेगळे वातावरण आणि रनिंगचे कल्चरच जळगावात निर्माण केले आहे. पुणे, मुंबईच्या धर्तीवर जळगावात प्रथम होत असलेल्या मॅरेथॉन स्पर्धेचा उत्साह जळगाव शहरात आज खऱ्या अर्थाने पाहावयास मिळाला. तीन गटातील या खानदेश रनमध्ये दोन ते अडीच हजार रनर्सचा सहभाग होता. 

यामुळे सागर पार्क ते काव्यरत्नावलीपर्यंतचा परिसर गर्दीने भरलेला होता. खानदेश रनचे टी- शर्ट परिधान करून लहान मुलांसह, युवक- युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक उपस्थित झाले होते. शिवाय, जळगावात प्रथमच अशा प्रकारची मोठी मॅरेथॉन होत असल्याने स्पर्धा पाहणाऱ्यांची आणि सहभागी रनर्सचा उत्साह वाढविण्यासाठी नागरिकांची देखील तितकीच गर्दी होती.

पहाटे पाचपासून बहरले सागरपार्क
खानदेश रनचा उत्साह तसा शनिवारपासूनच (ता. ९) निर्माण झाला होता. खानदेश सेंट्रल येथे खानदेश रन एक्‍स्पोचे आयोजन करून सहभागींना किटचे वाटप करण्यात आले होते. आज पहाटे सहाला पहिल्या रनला सुरवात होणार असल्याने सागर पार्क मैदानावर पहाटे पाचपासूनच गर्दी जमा होऊ लागली होती. आई- वडिलांसोबत चिमुकलेही धावण्यासाठी सज्ज असल्याचे पाहावयास मिळत होते. सहाला दहा किलोमीटरची रन सुरू होण्यापूर्वी संगीताच्या तालावर वॉर्मअप करून घेण्यात येत होता. सहाला प्रत्यक्षात रनला सुरवात झाल्यानंतर जिंकण्याच्या ओढीने स्पर्धेला सुरवात झाली. पण, दुसरीकडे जिंकण्यासाठी नाही, तर मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन रन पूर्ण करून त्याचा आनंद घेणारेच जास्त पाहावयास मिळाले. 

खेळाडूंना ‘चिअरअप’
शाब्बास...कमॉन कमॉन, बॅकअप...वेलडन...असा आवाज आज पहाटेपासूनच रस्त्यांवरून दुतर्फा घुमत होता. आपले सोबती धावपटूंच्या बरोबरीने धावत असल्याचा आनंद जळगावकर घेत होते. स्पर्धकांना प्रोत्साहित करण्यासाठी ढोल, ताशे, तुतारी यासह टाळ्यांच्या कडकडाटात नागरिक प्रोत्साहन देत होते. 

रनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरः या रनमध्ये फिनिश लाईनवर बिब, इलेक्‍ट्रॉनिक टायमिंग कार, गुडी बॅग, रनर्सच्या पुढे चालणारी गाडी, यासह ड्रोन कॅमेराद्वारे शूटिंग करण्यात येत होती. तसेच सहभागी रनर्सला ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था, एनर्जी ड्रिक आणि रन फिनिश केल्यानंतर केळी व नाश्‍ताची व्यवस्था देखील करण्यात आली होती.

मान्यवरही धावलेः दहा किलोमीटरच्या रनमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू क्रांती साळवी व पोलिस अधीक्षक यांनी सहभाग घेऊन रन पूर्ण केली. तर तीन किलोमीटरच्या रनमध्ये माजी मंत्री सुरेशदादा जैन, महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील, तत्कालीन पोलिस अधीक्षक जालिंधर सुपेकर, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी सहभाग घेतला.

क्षणचित्रे...
पहाटे सहाला रनला सुरवात
ढोल- ताशा, टाळ्यांनी चिअरअप
खेळाडूंसाठी सेल्फी झोन
संगीतमय वातावरणात वार्मअप
आबालवृद्धांचा सहभाग
अडीच हजार स्पर्धकांचा सहभाग
धावल्यानंतर सेल्फी घेण्याचा आनंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com