रोज धावा अन्‌ जगा आनंदी जीवन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

धावण्याचे फायदे...
 धावल्यामुळे शरीर होते बळकट  अनेक व्याधी पळतात दूर
 शिस्त येते, दिवस आनंदात जातो  उत्साही राहून इतरांना प्रेरणा देऊ शकतो  एका सेकंदाचे महत्त्व कळते

जळगाव - ‘निसर्गाने शिकविले, की थांबला तो संपला. यामुळे रोज नियमाने धावण्याने शरीराने तंदुरुस्त राहण्याबरोबरच आनंदी, आत्मविश्‍वास मिळेल. हाच आत्मविश्‍वास जीवनातील प्रत्येक संघर्षात तुम्हाला लढण्याची जिद्द देतील. महिला दैनंदिन कामे करताना आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तेच दुर्लक्ष पुढे मोठी व्याधी बनते. यामुळे रोज धावा, निरोगी व आनंदी जीवन मिळवा,’ असा सल्ला आंतरराष्ट्रीय धावपटू क्रांती साळवी यांनी आज येथे महिलांसह सर्वांनाच दिला.

जळगाव रनर्स ग्रुप व रोटरी क्‍लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे ‘दौडो जिंदगी के लिए’ या विषयावर आंतरराष्ट्रीय धावपटू साळवी यांचे व्याख्यान झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की आमच्या सोसायटीच्या धावण्याच्या स्पर्धेत मी सहज सहभागी धावले. त्यात धावल्याबद्दल टी शर्ट मिळाला. हीच माझी प्रेरणा ठरली. धावण्याकडे मी लक्ष दिले. माझा मुलगा-चिरागही धावणे, पोहणे शिकत होता. यामुळे मला धावण्याची आवड निर्माण झाली. २०१२ मध्ये हाफ रनिंग स्पर्धेत सहभाग घेतला. त्यात दहा हजार स्पर्धक होते. त्यातही सहावा क्रमांक मिळविला. २०१३ मध्ये मोठ्या धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला. कारण, तेथे स्पर्धक कमी असतात. त्यातही बक्षीस मिळविले. पती प्रमोद, मुलाने धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेण्याबाबत प्रोत्साहन दिले. मॉरिशसच्या बोस्टन ॲथेलिटेक्‍स स्पर्धेचे मी ध्येय ठेवून भरपूर सराव केला, तेव्हा यश मिळविले.

रोटरी क्‍लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष ॲड. सूरज जहाँगीर, सचिव कुमार वाणी, ‘रायसोनी मॅनेजमेंट’च्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल, जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील, डॉ. वृशाली पाटील, डॉ. कीर्ती देशमुख आदी व्यासपीठावर होते. रनर्स ग्रुपचे संस्थापक किरण बच्छाव यांनी सौ. साळवी यांचा परिचय करून दिला. डॉ. रवी हिराणी यांनी प्रास्ताविक केले. रनर्स ग्रुपच्या तृप्ती बढे, सिमरन कौर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सीमा पाटील, वंदना बच्छाव, प्रेमलता सिंग आदींनी सहकार्य केले.