विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

जळगाव - दिवाळी सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलाय. दिवाळीचे खास आकर्षण असते- आकाशकंदील. त्यातही आपल्या हाताने तयार केलेला आकाशकंदील घरावर लावण्याचा आनंद काही वेगळाच असतो. हा आनंद विद्यार्थ्यांना लुटता यावा, या उद्देशाने आज ‘सकाळ-एनआयई’तर्फे ‘आकाशकंदील बनवा’ स्पर्धा घेण्यात आली. यात पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. 

जळगाव - दिवाळी सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलाय. दिवाळीचे खास आकर्षण असते- आकाशकंदील. त्यातही आपल्या हाताने तयार केलेला आकाशकंदील घरावर लावण्याचा आनंद काही वेगळाच असतो. हा आनंद विद्यार्थ्यांना लुटता यावा, या उद्देशाने आज ‘सकाळ-एनआयई’तर्फे ‘आकाशकंदील बनवा’ स्पर्धा घेण्यात आली. यात पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. 

‘सकाळ- एनआयई’ व ‘समाधा क्रिएशन’तर्फे ‘आकाशकंदील बनवा’ स्पर्धा आज शिवतीर्थ मैदानावर झाली. स्पर्धा तीन गटांत घेण्यात आली. पहिला गट पहिली ते तिसरी, दुसरा गट चौथी ते सहावी व तिसरा गट सातवी ते दहावी असा होता. यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक आकाशकंदील बनविले. यात कार्डशीट, रंगीत पेपर आदींचा योग्य रीतीने वापर करीत आपल्या कल्पकतेतून सुंदर आकाशकंदील बनविला. विद्यार्थ्यांनी तासाभरात विविध प्रकारचे लहान व मोठे आकाशकंदील तयार केले. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही उत्सुकता दिसून आली. यावेळी परीक्षक म्हणून दीपा देशपांडे व भारती चौधरी यांनी काम पाहिले. स्पर्धेनंतर विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी ‘सकाळ’चे युनिट मॅनेजर संजय पागे, ‘समाधा क्रिएशन’चे संचालक अनिल गेही उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहात आपले आकाशकंदील घरी घेऊन गेले.

प्रत्येकास हमखास बक्षीस! 
‘सकाळ-एनआयई’ व ‘समाधा क्रिएशन’तर्फे आयोजित ‘आकाशकंदील बनवा’ स्पर्धा तीन गटांत झाली. यात पहिला गट पहिली ते तिसरी, दुसरा गट चौथी ते सहावी तर तिसरा गट सातवी ते दहावी यानुसार स्पर्धा घेण्यात आली. यात आकर्षक आकाशकंदील बनविणाऱ्या प्रत्येक गटातील तीन विद्यार्थ्यांना अनुक्रमे एक हजार रुपये, सातशे रुपये व पाचशे रुपयांचे ‘गिफ्ट व्हाउचर’ देण्यात आले. यासोबतच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ‘व्हाउचर’ कुपन व एक हमखास बक्षीस देखील देण्यात आले.

स्पर्धेतील विजेते
पहिला गट : पहिली ते तिसरी - प्रथम समृद्धी कोळी, द्वितीय - सारंग कदम. दुसरा गट : चौथी ते सहावी - प्रथम - तन्वी वाणी, द्वितीय - गार्गी खैरनार, तृतीय - जान्हवी मालपाणी, 
तिसरा गट : सातवी ते दहावी - प्रथम - गुरुदत्त पाटील, द्वितीय - सोहम जोशी, तृतीय - गजानन कुलकर्णी.

विद्यार्थ्यांचे बोल....
कोणाचीच मदत न घेता स्वत: आकाशकंदील तयार केला. कंदील बनविताना खूप मजा आली. त्यामुळे मी नेहमी घरी आकाशकंदील बनवत जाईल.
- गार्गी खैरनार

गणपतीप्रमाणेच आकाशकंदील बनवायला मिळाल्याने खूप छान वाटले. सर्व मित्रांनी वेगवेगळे कंदील बनविले होते. स्वत: कंदील बनवून आपल्या घरावर लावण्याची मजा वेगळीच आहे. 
- आदिनाथ बाविस्कर

मी पहिल्यांदाच स्वत: आकाशकंदील तयार केला. खूप आनंद वाटला. मी हाच आकाश कंदील यंदा आमची घरी लावणार आहे.
- गजानन कुलकर्णी