चाळीसगाव: बिबट्याचे सलग दोन दिवसात तीन हल्ले

शिवनंदन बाविस्कर
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

मंगळवारी (ता.15) काकळणे(ता. चाळीसगाव) शेती शिवारात जिजाबाई नाईक(वय 65) यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच काल(ता.16) सायगाव(ता. चाळीसगाव) येथे दुपारी साडे तिनला सखुबाई सुकदेव माळी(वय 65) आणि रात्री साडे नऊला बारा वर्षीय मुलीवर हल्ला झाला.

पिलखोड(ता. चाळीसगाव) : बिबट्याने सलग दोन दिवसात तीन हल्ले केल्याची घटना काकळणे(ता. चाळीसगाव) आणि सायगाव(ता. चाळीसगाव) परिसरात घडली. या हल्ल्यांमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे.  

मंगळवारी (ता.15) काकळणे(ता. चाळीसगाव) शेती शिवारात जिजाबाई नाईक(वय 65) यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच काल(ता.16) सायगाव(ता. चाळीसगाव) येथे दुपारी साडे तिनला सखुबाई सुकदेव माळी(वय 65) आणि रात्री साडे नऊला बारा वर्षीय मुलीवर हल्ला झाला. यात दोघे जखमी असून दोघांना धुळे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल (ता.16) हिरालाल पांडुरंग शिरोडे यांच्या ऊसाच्या शेतात 22 महिला मजूर निंदणीचे काम करीत होत्या. साडे तीनच्या सुमारास सखुबाई सुकदेव माळी(वय 65) यांच्यावर हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला. त्यात प्राण्याने त्यांच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला चावा घेतला असून हाताला पंजा मारला आहे. त्यात त्या जखमी झाल्या आहेत. त्यांना आधी रुग्णवाहिकेतून चाळीसगावला उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना धुळे येथे हलविण्यात आले आहे. सदर माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. वनपाल आजाद शेख, वनरक्षक प्रकाश पाटील, पी. पी. गवारे, प्रताप सोनवणे व वनमजूर यावेळी उपस्थित होते. पुन्हा सायगावला रात्री साडे नऊला बारा वर्षीय मुलीवर हल्ला झाला. यात ती जखमी असून तिला धुळे येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. सदर घटनांमुळे परिसरात भीती पसरली असून वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.