चाळीसगाव: पोहरे येथे अवैध दारू विकणाऱ्यांवर कारवाई

दिपक कच्छवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

महिलांकडून कारवाईचे स्वागत
ग्रामीण भागात खुलेआम विकली जाणार्‍या गावठी दारूमुळे महिलांना त्रास होत आहे. अनेक गावामध्ये ग्रामसभेत दारूबंदिचे ठराव देखील करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाकडुन या ठरावांना केराची टोपली दाखवली गेली आहे. त्यामुळे मेहुणबारे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे महिलांकडून स्वागत करण्यात येत आहे. पोलिसांनी अशीच कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.

मेहुणबारे ता.चाळीसगाव : परिसरात अवैध दारूची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने दारूविक्रेत्यामध्ये खळबळ उडाली आहे. पोहरे
(ता.चाळीसगाव) येथे गावात दोन ठिकाणी धाड टाकून विस हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन नष्ट करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रीयतेमुळे पोलिसांना  याबाबत पुढाकार घ्यावा लागत आहे. आज सकाळी आठ वाजता पोहरे( ता.चाळीसगाव) येथील महिला निता भाऊसाहेब सोनवणे यांच्या घराच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू तयार करत असतांना रंगेहाथ पकडले. याठिकाणी पोलिसांनी सुमारे 9 हजार रूपयांचे कच्चे रसायन जागेवर नष्ट करून निता सोनवणे यांना अटक करण्यात केली. त्याच ठिकाणी अजुन दारू विक्री होत असल्याची माहीती उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी लगेच आपला मोर्चा तेथील भिलाठी भागाकडे वळविला. त्या भागात सिंधुबाई चिंधा मोरे ही महिला सकाळी साडेआठ वाजता घराच्या आडोशाला दारू गाळतांना रंगेहाथ सापडली. तिच्याकडून सुमारे 11 हजार रूपयांचे कच्चे रसायन जप्त करून जागेवर नष्ट करण्यात आले. या दोघा महिलांना महिला  पोलीस कॉन्स्टेबल कल्पना चाथे यांनी अटक करून फिर्याद दिली. ही कारवाई उपनिरीक्षक हेमंत शिंदे, पोलिस हवालदार कैलास पाटील, दीपकसिंग राजपुत गृहरक्षक दलाचे जवान  कृष्णा पाटील, कालु जाधव, राजु चव्हाण आदींनी ही कारवाई केली. 

महिलांकडून कारवाईचे स्वागत
ग्रामीण भागात खुलेआम विकली जाणार्‍या गावठी दारूमुळे महिलांना त्रास होत आहे. अनेक गावामध्ये ग्रामसभेत दारूबंदिचे ठराव देखील करण्यात आले आहे. मात्र प्रशासनाकडुन या ठरावांना केराची टोपली दाखवली गेली आहे. त्यामुळे मेहुणबारे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे महिलांकडून स्वागत करण्यात येत आहे. पोलिसांनी अशीच कारवाई सुरू ठेवावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.

अनाधिकृत दारू विक्रेत्याविरूध्द आमच्या कारवाया सुरूच राहणार आहेत.या कारवायासाठी ग्रामस्थ व पोलिस मित्रांची मदत आम्ही घेत आहोत.त्यामुळे पोलिसाना गावागावातुन सहकार्य मिळणे अपेक्षित आहे.
- दिलीप शिरसाठ, सहाय्यक पोलीस निरीक्षक  मेहुणबारे 

Web Title: Jalgaon news liquor in chalisgaon