जळगाव जिल्ह्यात वीजचोरी प्रकरणी एक वर्षाचा कारावास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

जळगाव - "महावितरण'च्या जळगाव परिमंडळातर्फे वीजचोरी करण्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. या कारवाईतंर्गत शहाद्यात मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याप्रकरणी शहादा सत्र न्यायालयाने विनायक निंबा पवार (शहादा) यांना एक वर्ष कारावास व 16 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

वीजचोरी करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी "महावितरण'कडून पथक नेमण्यात आले आहेत. या अंतर्गत नंदूरबार येथील "महावितरण'च्या भरारी पथकाने वीजचोरी विरुध्द कारवाई करुन "महावितरण'च्या नाशिक पोलिस स्टेशन येथे 102/12 प्रमाणे 21 जानेवारी 2012 रोजी गुन्हा नोंदविला होता. पथकाद्वारे 30 डिसेंबर 2011 रोजी विनायक पवार यांच्या घरगुती वीज पुरवठा व विद्युत संच मांडणीची तपासणी केली. या तपासणीत वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचे निदर्शनास आले. संबंधीताने वीज मिटरमध्ये वीज खांबावरुन येणारी व वीज मीटर मधुन जाणारी न्युट्रल (आर्थिंग) वायर काढलेली होती. त्यामुळे वीजमीटर ग्राहकाचा वीज वापर नोंदवित नव्हते. भरारी पथकाचे तत्कालिन उपकार्यकारी अभियंता बी. एस. तायडे यांनी या वीज चोरी प्रकरणाचा छडा लावला. यानुसार विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 135 नुसार शहादा सत्र न्यायालयात दोषी विरुध्द खटला चालविण्यात आला. सत्र न्यायालयाने दोषीस विद्युत अधिनियम 2003 चे कलम 135 (1) (ब) व (क) आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 235 (1) नुसार एक वर्ष कारावास व 16 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. जळगाव परिमंडळातील वीजचोरी करणाऱ्याला कारावासाची शिक्षा ही पहिली कारवाई आहे.